तळेगाव- कासारी रस्त्यावर पूल कधी होणार?
ग्रामस्थ, प्रवासी, वाहनचालकांचा सवाल; प्रशासनाचे दुर्लक्ष
तळेगाव ढमढेरे, ता. १९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे वेळ नदीवर पीएमआरडीएतर्फे तयार केलेल्या तळेगाव ढमढेरे- कासारी या बाह्यवळण रस्त्यावर नवीन पूल कधी होणार? अशा प्रश्न ग्रामस्थ, प्रवासी वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
येथील वेळ नदीवरून अहिल्यानगरहून कासारी फाटामार्गे पुण्याकडे जाणारी वाहने बाह्यवळण रस्त्यावरून जातात. शिक्रापूर येथील वाहतूक कोंडीला प्रतिबंध करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी बाह्यवळण रस्ता सर्वांसाठी उपयोगी ठरत आहे. या बाह्यवळण रस्त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी वाढली आहे. असे असले तरी या बाह्यवळण रस्त्याचे सुमारे ५०० मीटर काम गेली ७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. तसेच, या रस्त्यावर वेळ नदीवर पक्का पूल नसल्याने येथील रस्ता पुराच्या पाण्याने खचला आहे. येथील नदीवर एका खासगी गृह सोसायटीने लोकांची अडचण दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कच्चा पूल तयार केला आहे. बाह्यवळण रस्त्यावर पुलाच्या उत्तरेकडे सुमारे ५०० मीटर रस्ता पीएमआरडीएने अर्धवट अवस्थेत ठेवला आहे.
वेळ नदीच्या कच्च्या पुलावरील तळेगाव- न्हावरा रस्त्यापर्यंत संपूर्ण रस्ता खचला आहे. हा रस्ता तीन वर्षापूर्वी वेळ नदीच्या पुराने वाहून गेला होता, त्यामुळे स्थानिक प्रशासनाला वाहतूक बंद करावी लागली होती. तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पुलावरील खचलेला भरावा तात्पुरता दुरुस्त केला. मात्र, पावसाळ्यात पुन्हा पुलावरून पाणी गेल्याने रस्ता खचला असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आता या रस्त्यावरून वाहने चालवणे अडचणीचे झाले आहे.
येथील खचलेला भरावा दुरुस्त करावा, ५०० मीटर अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि वेळ नदीवर नवीन पुलाची बांधणी करावी यासाठी ‘सकाळ’ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्याआहेत. या बातम्यांची दखल घेऊन दीड वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार ॲड. अशोक पवार व पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून काम करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, येथील पुलावरील उर्वरित अर्धवट दोन्ही बाजूच्या रस्त्याचे व नवीन प्रस्तावित पुलाच्या कामाचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन आमदार पवार यांच्या हस्ते झाले असून, त्यासाठी आठ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. तसे येथील भूमिपूजनाच्या फलकावर सूचित केले आहे. येथील फलकावर खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार ॲड. अशोक पवार यांची नावे आहेत.
त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, अद्याप लोकप्रतिनिधींनी या पुलाची व रस्त्याची दखल घेतलेली नाही. प्रवासी, स्थानिक नागरिक व वाहन चालक मात्र हा पूल कधी होईल? याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, या रस्त्याच्या संदर्भात पीएमआरडीएच्या प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.
येथील बाह्यवळण रस्त्यावरील वेळ नदीवरील पुलाच्या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- ॲड. स्वप्नील ढमढेरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ, कात्रज
या रस्त्याच्या संदर्भात पीएमआरडीएचे अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून, या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे.
- जयेश शिंदे, अध्यक्ष, शिरूर तालुका भाजप
येथील वेळ नदीवरील नवीन पूल व अपूर्ण रस्त्याच्या संदर्भात माजी आमदार अशोक पवार व ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून पीएमआरडीए प्रशासनाने प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, शासन बदलल्यानंतर तो प्रश्न रेंगाळलेला आहे. या रस्त्यासाठी प्रशासनाला निवेदन देऊन प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- विश्वास ढमढेरे, अध्यक्ष, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ः पीएमआरडीएच्या बाह्यवळण रस्त्यावरील वेळ नदीवरील पुलाची पाहणी करताना तत्कालीन आमदार अशोक पवार व पदाधिकारी. (संग्रहित छायाचित्र).
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ः वेळ नदीवरील बाह्यवळण रस्त्यावरील खचलेल्या पुलावर भूमिपूजनाचा फलक.