PUBG खेळणाऱ्यांसाठी वाईट माहिती ! 'या' तारखेपासून गेम होणार बंद
Tv9 Marathi August 21, 2025 04:45 AM

जगप्रसिद्ध गेम ‘PUBG: बॅटलग्राउंड्स’ खेळणाऱ्या लाखो गेमर्ससाठी एक वाईट बातमी आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, आता हा गेम प्लेस्टेशन 4 (PS4) आणि एक्सबॉक्स वन (Xbox One) या जुन्या कन्सोलवर उपलब्ध राहणार नाही. गेम डेव्हलपर्सनी सांगितले आहे की, या वर्षी नोव्हेंबरपासून गेमला फक्त प्लेस्टेशन 5 (PS5) आणि एक्सबॉक्स सिरीज एक्स/एस (Xbox Series X/S) या नवीन कन्सोलवर सपोर्ट मिळेल.

जुना प्रवास 13 नोव्हेंबरपासून संपणार

PUBG: बॅटलग्राउंड्स चा PS4 आणि Xbox One वरील प्रवास 13 नोव्हेंबर 2025 रोजी संपुष्टात येईल. सुमारे सात वर्षांपूर्वी ‘प्लेअरअननोन बॅटलग्राउंड्स’ (PlayerUnknown’s Battlegrounds) या नावाने हा गेम या कन्सोलवर लाँच झाला होता. त्यानंतर, PUBG चे PS5 आणि Xbox Series X व्हर्जन नोव्हेंबर 2020 मध्ये आले होते.

हा निर्णय का घेण्यात आला?

डेव्हलपर्सच्या म्हणण्यानुसार, जुन्या कन्सोलवरून नवीन कन्सोलवर शिफ्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. या निर्णयामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.

उत्तम गेमप्ले अनुभव: खेळाडूंना अधिक स्थिर आणि स्मूथ गेमप्ले देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भविष्यातील अपडेट्स: नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गेममध्ये भविष्यात चांगले अपडेट्स आणता येतील.

समस्यांवर नियंत्रण: जुन्या डिव्हाईसवर होणारे क्रॅश (crash) आणि परफॉर्मन्सच्या समस्या यामुळे दूर होतील.

60 FPS चा अनुभव: सर्व नवीन प्लॅटफॉर्मवर 60 FPS (फ्रेम्स पर सेकंद) चा गेमिंग अनुभव देण्याचे लक्ष्य आहे.

नवीन कन्सोलवर काय मिळणार?

जे खेळाडू PS5 आणि Xbox Series X/S वर PUBG खेळतील, त्यांना अनेक फायदे मिळतील.

उत्कृष्ट ग्राफिक्स: गेमचे व्हिज्युअल्स आणि ग्राफिक्स खूप सुधारलेले दिसतील.

अधिक स्थिर फ्रेमरेट: गेम अधिक स्मूथ चालेल.

मल्टीपल मोड्स: Xbox Series S वापरकर्त्यांना ‘रिझोल्यूशन मोड’ (Resolution Mode) आणि ‘परफॉर्मन्स मोड’ (Performance Mode) असे दोन पर्याय मिळतील.

कंपनीची प्रतिक्रिया आणि रिफंड

हा निर्णय घेणे सोपे नव्हते, असे स्टुडिओने म्हटले आहे. “PS4 आणि Xbox One वर अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ही बातमी देणे आम्हालाही जड जात आहे. पण PUBG च्या दीर्घ भविष्यासाठी आणि सातत्यपूर्ण विकासासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे.”

ज्या खेळाडूंनी PS4 आणि Xbox One वर गेम खेळला आणि आता नवीन कन्सोलवर शिफ्ट होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी रिफंडची सोय केली जाईल. ‘बॅटलग्राउंड्स प्लस’ (Battlegrounds Plus) आणि ‘PUBG: बॅटलग्राउंड्स’साठी रिफंड संबंधित प्लॅटफॉर्म (Sony आणि Microsoft) च्या धोरणांनुसार केला जाईल. उल्लेखनीय आहे की, PUBG 2022 पासून एक ‘फ्री-टू-प्ले’ गेम बनला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.