Marathwada Rain : मराठवाड्यात पाच दिवसांत पावसाचे ११ बळी; साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
esakal August 21, 2025 04:45 AM

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सात जिल्ह्यांतील तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर मृतांचा आकडाही सहावरून अकरावर गेला आहे. याशिवाय बाधित गावांची संख्या ११५४ इतकी झाली असून, ५८८ घरांची पडझड झाली आहे.

मराठवाड्यात १४ ते १७ ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत मराठवाड्यात ११५४ गावे बाधित झाली आहेत. सात जिल्ह्यांतील ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिके पावसामुळे नष्ट झाली. एकट्या नांदेड जिल्ह्यात २ लाख ५९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हिंगोली ५६ हजार, लातूर जिल्ह्यात २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात पावसामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी सोमवारी समोर आली होती. परंतु, आता ही संख्या अकरावर पोचली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत प्रत्येकी दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, लहान-मोठी ४९८ जनावरेही दगावली आहेत. पावसामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. विभागात ५६१ कच्ची घरे, २१ पक्की घरे, दोन झोपड्यांची आणि चार गोठ्यांची पडझड झाली आहे.

नुकसानीचे क्षेत्र हेक्टर
  • जिरायती ३ लाख ५० हजार

  • बागायती ८१ हजार ६८

  • फळपीक १९८ हेक्टर

  • एकूण ३ लाख ५८ हजार ३७०.०२ हेक्टर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.