शहापूर तालुका जलमय; प्रशासन सतर्क
esakal August 21, 2025 08:45 AM

शहापूर तालुका जलमय
भातसाचे पाच, तानसाचे ३८ दरवाजे उघडले

किन्हवली, ता. २० (बातमीदार) : भातसा धरणाचे पाचही दरवाजे बुधवारी (ता. २०) सकाळी सात वाजून १५ मिनिटांनी सव्वा मीटरने उघडले, तर तानसा धरणाचे ३८ दरवाजे उघडले आहेत. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, तानसा धरणाचे ३८ दरवाजे उघडल्यामुळे सावरोली येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे वासिंद-वाडा रस्त्यावरील वाहतूक बंद केली. तथापि, शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुले यांनी सापगाव नदीवरील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या.

मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात सलग जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर अधिक वाढल्याने शेतातील उभे पीक पाण्यात गेल्याचे चित्र आहे. विशेषतः भात, नाचणी आणि माळरानावरील भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्याने शेतीचे पाणी बाहेर निघण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

बुधवारी (ता. २०) पहाटे तीन वाजता भातसा धरणाची पाणीपातळी १४० मीटर एवढी असून भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात सततचा पाऊस पडत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणीपातळी, जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे पाच वक्रद्वारे ०.७५ मीटरने उघडली होती; मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने बुधवारी पहाटे साडेतीन वाजता भातसा धरणाची पाच वक्रद्वारे ०.२५ मीटर वाढवण्यात आली. या भातसा धरणातून ४४४.५८५ क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित करण्यात आला. तथापि, भातसा धरणाच्या आजूबाजूस असलेल्या भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांना व गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबतची सूचना देण्यात आली. तसेच पुढील काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.

प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकिनारी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाशी संपर्क ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी न घाबरता जबाबदारीने सहकार्य करावे.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.