Nashik Kumbh Mela : गिरीश महाजनांनंतर आता छगन भुजबळांनीही बोलावली कुंभमेळ्याची बैठक: संघर्ष वाढणार?
esakal August 21, 2025 08:45 AM

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीसंदर्भात मंत्री छगन भुजबळ गुरुवारी (ता. २१) आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी अडीचला होणाऱ्या बैठकीप्रसंगी सर्व वरिष्ठांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणावरून आधीच महायुतीत वादाचे प्रसंग उभे ठाकले असताना भुजबळांनी कुंभमेळा बैठक बोलविल्याने महायुतीतील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. भाजपचे संकटमोचक तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे शासनाने नियोजनाची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार मंत्री महाजन हे विविध कारणांनी नाशिक दौऱ्यावर असताना कुंभमेळ्याचा नित्यक्रमाने आढावा घेतात. शुक्रवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी त्यांनी बैठक घेत सिंहस्थाच्या कामांना गती देण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. मात्र नाशिकमधील मंत्री व लोकप्रतिनिधींना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले.

अगोदरच स्वातंत्र्यदिनी बाहेरच्या व्यक्तीने नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यावरून महायुतीत वाद निर्माण झाला असताना कुंभमेळ्याच्या नियोजनात भाजप विश्वासात घेत नसल्याची भावना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळावली आहे. या सर्व वादात अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांनी उडी घेतली आहे.

मंत्री भुजबळांनी बोलाविलेल्या बैठकीत सर्व वरिष्ठांना पाचारण करताना आतापर्यंतचे नियोजन, मंजूर झालेली कामे, प्राधान्य कामांची यादी, निधीची उपलब्धता अशा विविध प्रकारची माहिती घेऊन बैठकीत उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले आहे. विशेष म्हणजे, भुजबळांनी यापूर्वी सिंहस्थ कामांच्या कंत्राटावरून शासनाला पर्यायाने भाजपला घरचा आहेर दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बैठकीत मंत्री भुजबळ काय भूमिका घेतात, याकडे महायुतीमधील मित्रपक्षांचे लक्ष लागले आहे.

Balasaheb Thorat : बलिदान आनंदाने स्वीकारण्याची तयारी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात; वारकरी संप्रदाय मानवतेचा संदेश देणारा

निमा-आयमा, येवल्याप्रश्नी बैठक

सिंहस्थ कुंभमेळा बैठकीनंतर निमा- आयमा संघटनाच्या विविध प्रश्नांबाबत, तसेच येवला मतदारसंघातील सिंचन, रस्ते व अन्य प्रश्नांवरही आढावा पार पडणार आहे. या बैठकांनादेखील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बैठकांच्या माध्यमातून मंत्री भुजबळ ॲक्शन मोडवर आल्याने यंत्रणादेखील कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.