गणपती बाप्पा मोरया! गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सगळे जण कोकणात जायला उत्सुक असाल. ट्रेनची तिकीटं कन्फर्म झाली असतील, खरेदी झाली असेल आणि तुम्ही बॅग पॅक करायला सुरुवात केली असेल. पण थांबा! तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कोणत्या वस्तू ठेवताय हे एकदा तपासा. रेल्वे प्रवासादरम्यान काही वस्तू सोबत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या कोकण प्रवासाचा आनंद क्षणात मातीत मिसळू शकतो.
हे नियम का महत्त्वाचे आहेत?
कोकणात जाताना ट्रेनमध्ये होणारी गर्दी आपल्याला माहित आहे. अशा वेळी, प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक महत्त्व असते. काही वस्तू ज्वलनशील किंवा विषारी असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेने काही वस्तू घेऊन जाण्यास मनाई केली आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळला, तर रेल्वे ॲक्टच्या कलम 164 नुसार त्याला 1,000 रुपयांपर्यंतचा दंड, 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बाप्पाच्या दर्शनाऐवजी थेट पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल.
ट्रेनमध्ये कोणत्या गोष्टींना मनाई आहे?
- सुके खोबरे: गणपतीसाठी खोबरे लागतेच, पण सुके खोबरे अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे ते ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यामुळे खोबरे सोलून आणि सुरक्षित पॅकिंग करूनच न्या.
- गॅस सिलेंडर: कोकणात गेल्यावर स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरची गरज लागते, पण प्रवासादरम्यान गॅस गळतीचा धोका असतो. त्यामुळे तो ट्रेनमध्ये घेऊन जाऊ नये.
- फटाके आणि दारूगोळा: गणपतीच्या उत्साहात फटाके वाजवले जातात, पण फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका खूप जास्त असतो, म्हणून ते ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई आहे.
- ॲसिड आणि रसायने: ॲसिड किंवा टॉयलेट क्लिनरसारखी रसायने ट्रेनमध्ये घेऊन जाऊ नये. ती सांडल्यास इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो.
- पेट्रोल, डिझेल आणि रॉकेल: हे ज्वलनशील पदार्थ आहेत आणि त्यांना रेल्वेतून घेऊन जाणे कायद्याने गुन्हा आहे.
- काड्यापेटी आणि स्टोव्ह: ट्रेनमध्ये काड्यापेटीमुळे आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे चुकूनही काड्यापेटी किंवा स्टोव्ह सोबत घेऊ नका.
- दुर्गंधीयुक्त पदार्थ: खराब झालेले अन्न किंवा इतर कोणत्याही दुर्गंधीयुक्त वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो.
- तूप: गणपतीच्या नैवेद्यासाठी तूप लागते. रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही 20 किलोपर्यंत तूप घेऊन जाऊ शकता, पण ते टिनच्या डब्यात सुरक्षितपणे पॅक केलेले असावे.
गणपतीच्या दर्शनासाठी कोकणात जाताना हे नियम लक्षात ठेवा. तुमचे आणि तुमच्या सहप्रवाशांचे प्राण सुरक्षित ठेवणे तुमच्या हातात आहे. हा प्रवास आनंदाचा होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.