उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : भरपावसाने त्रस्त झालेल्या उल्हासनगरकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे या बुधवारी (ता. २०) सकाळी पूरग्रस्त भागात दाखल झाल्या. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांतून मार्गक्रमण करत त्यांनी नागरिकांच्या व्यथा ऐकत समस्या जाणून घेतल्या. तातडीने मदत व पुनर्वसनाची यंत्रणा गतिमान करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
शहरात तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आयुक्त आव्हाळे यांनी पूरग्रस्त भागांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आयुक्तांनी राजीव गांधीनगर, करोतिया नगर, महात्मा फुले नगर, शांतीनगर, मीनाताई ठाकरे नगर, वेदांत कॉलेज परिसर व भरतनगर येथे जाऊन पाहणी केली. पावसाचे पाणी घरे, वस्त्यांमध्ये शिरल्याने भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती त्यांनी थेट रहिवाशांकडून घेतली. तक्रारी काळजीपूर्वक ऐकून आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले. दौऱ्यावेळी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, एकनाथ पवार, यशवंत सगळे, अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
मूलभूत गरजांवर भर
प्रभाग क्रमांक १० मधील वेदांत महाविद्यालय परिसरात पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्याची पाहणी करून, स्थलांतरित कुटुंबांना अन्न, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले. आवश्यकतेनुसार वैद्यकीय पथके सतत कार्यरत ठेवण्यास आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यास आयुक्तांनी विशेष भर दिला.
अतिवृष्टीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. महापालिका नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील. प्रत्येक प्रभागात अधिकारी कार्यरत आहेत. कोणत्याही नागरिकाला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनावर विश्वास ठेवावा.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका