कळमनुरी : पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गांगापूर परिसरात ३६ तासांपासून शेत आखाड्यावर अडकून पडलेल्या आठ जणांना महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने मंगळवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास सुखरूप बाहेर काढले. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
तालुक्यातील गांगापूर भागात शेत आखाड्यावर राहणारे रघुनाथ लाखाडे, उषा लाखाडे, त्यांची मुले अर्जुन लाखाडे (वय ५) व खुशी लाखाडे (३) यांच्यासह वास्तव्याला होते. तीन दिवसांपूर्वी इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे पैनगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे या परिसरातील इतर आखाड्यांवर असलेले संतोष पेदे, संजय शिंदे, ज्ञानेश्वर बोक्से, सुनील सोनुलकर यांनी उंचावर असलेल्या एका शेत आखाड्यावर आश्रय घेतला. मात्र, रात्रीतून या भागाला पैनगंगा नदीने वेढा घातला.
त्यातच गांगापूर परिसरातील पुराने वेढलेल्या आखाड्यावर आठ जण अडकून पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे, नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, ग्राम महसूल अधिकारी कमलाकर यादव, विशाल पतंगे, शेख मन्सूर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आखाड्यावर अडकलेल्या ग्रामस्थांची सुटका करण्याच्या सूचना दिल्या.
हिंगोली येथून आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, आखाड्यापर्यंत बोटीने पोचणे शक्य न झाल्याने सुरवातीचे प्रयत्न अपुरे ठरले. त्यामुळे मंगळवारी बोटीचे आवश्यक इंजिन मागविण्यात आले. त्यानंतर आठही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या पथकामध्ये अक्षय तांडेल, रवी कांबळे, संजय ननावरे, बजरंग थिटे, आकाश साबळे यांचा समावेश होता.