पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. उत्सव शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगार, जामिनावर बाहेर आलेले आरोपी, तसेच तडीपार गुन्हेगारांवर नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन्सच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, सर्व परिमंडळातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.
‘सीसीटीव्ही’द्वारे बारकाईने नजरशहरातील गणेश मंडळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रणाली थेट नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात येत आहेत. वायरलेस विभागाला याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतूक कोंडीतून दिलासा देणारवाहतूक कोंडी, तसेच गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित परिमंडळातील पोलिस अधिकारी आणि वाहतूक पोलिस विभागाला स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध विसर्जन मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक पथके तैनात करण्यात येणार आहेत.
महत्त्वाचे निर्णयरात्रपाळीत कडक गस्त : रात्री कोणताही अनुचित प्रकार घडताच संबंधित अधिकारी घटनास्थळी धाव घेणार. गंभीर गुन्हा असेल तर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येईल
नाकाबंदी व ऑल आउट मोहीम : मकोका, एमपीडीए, तडीपार, फरार आरोपी यांच्यावर कठोर कारवाई
पब, बार वेळेत बंद : रात्री दीड वाजल्यानंतर सुरू असलेल्या पब, बारवर कारवाई
नियंत्रण कक्षातून प्रतिसाद : नागरिकांच्या संपर्कानंतर पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल होणार
नाइट राउंड अधिकाऱ्यांची गस्त वाढविणार : प्रत्येक भागात अधिकारी आणि चार-पाच पोलिस अंमलदारांसह गस्त
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा