देवेंद्र फडणवीसांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, कारण काय? संजय राऊतांनी सांगितली Inside स्टोरी
Tv9 Marathi August 21, 2025 11:45 PM

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. एनडीएचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना विजयी करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या जबाबदारीच्या अनुषंगाने फडणवीस यांनी थेट महाविकास आघाडीतील नेत्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने देवेंद्र फडणवीसांवर विशेष समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. यामुळे त्यांना एनडीएच्या उमेदवारासाठी देशभरातील खासदारांचा पाठिंबा मिळवायचा आहे. या प्रयत्नांची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे. देवेंद्र फडणवीस हे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराविरुद्ध पाठिंबा मिळवण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही संपर्क साधत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या फोन कॉलची पुष्टी केली आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मतांसाठी विनंती करणे हे त्यांचे कामच आहे.” यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या फोन केल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. राजकीय मतभेद असले तरी, उपराष्ट्रपतीपदासारख्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंचे नेते संपर्क साधत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातील माणूस हा उपराष्ट्रपती होतोय, त्यामुळे त्यांना मतदान करायला हवं. माझं महाराष्ट्रातील इतर पक्षांना देखील आवाहन आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्हीही गटांनी देखील सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन द्यायला हवं. आपल्या महाराष्ट्रातील एक मतदार हा उपराष्ट्रपती होतोय, त्यासाठीही त्याल मदत करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कधी?

दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए आघाडीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात सुदर्शन रेड्डी यांनी संधी दिली आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता एकूण 68 खासदार आहेत. महाविकास आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेचा विचार करता 38 खासदारांचे बळ आहे. तर महायुतीचा 30 खासदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचं पारडे जड वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.