Shreyas Iyer : आशिया कपमधून डच्चू, आता श्रेयस अय्यर याला आणखी एक झटका!
GH News August 22, 2025 12:13 AM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी श्रेयस अय्यर याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. श्रेयसला संधी न मिळाल्याने त्याची एकच चर्चा पाहायला मिळत आहे. श्रेयसला संधी न देण्यावरुन अनेक आजी माजी खेळाडूंनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर आता श्रेयसला आणखी एक मोठा झटका लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयसला मुंबई क्रिकेट संघाचं कर्णधारपद मिळणार नाही. अजिंक्य रहाणे याने गुरुवारी 21 ऑगस्टला सोशल मीडियावरुन मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं. अजिंक्यच्या राजीनाम्यानंतर श्रेयसला नेतृत्वाची धुरा मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये शार्दूल ठाकुर कर्णधार होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शार्दूल मुंबईचा कर्णधार!

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशन अजिंक्यच्या जागी शार्दूलला कर्णधार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शार्दूल 28 ऑगस्टपासून सुरुवात होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोनचं नेतृत्व करणार आहे. मात्र कर्णधार म्हणून श्रेयस चांगला पर्याय नाही का? असा प्रश्न या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

श्रेयसला नेतृत्वाचा बऱ्यापैकी अनुभव आहे. श्रेयसने मुंबईचं व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं आहे. श्रेयसने मुंबईचं सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत नेतृत्व केलंय. श्रेयसने मुंबईला गेल्या हंगामात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. अशात श्रेयसचा कर्णधार म्हणून विचार का करण्यात आला नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

श्रेयससोबत अन्याय!

श्रेयसने गेल्या 2 वर्षांत प्रत्येक फॉर्मेटमध्ये चाबूक कामिगरी केली आहे. श्रेयसला बीसीसीआयने 2024 मध्ये वार्षिक करारातून वगळलं होतं. श्रेयसने त्यानंतर देशांतर्गत, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करुन दाखवली. श्रेयसने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करुन भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

श्रेयस अय्यर याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) पंजाब किंग्सला त्याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत पोहचवलं. श्रेयसने या हंगामात 600 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र त्यानंतरही निवड समितीने श्रेयसला आशिया कपसाठी लायक समजलं नाही. त्यामुळे आता श्रेयसला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार हे मात्र निश्चित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.