नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ गुरुवारी (ता. २१) बैठक घेणार आहेत. मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच भुजबळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार असल्याने प्रशासनात धावपळ उडाली आहे. अवघ्या जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
अवघ्या दीड वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून, प्रशासकीय पातळीवर नियोजनाला सुरुवात झाली आहे. शासनाने कामांचे प्राधान्य निश्चित करण्याचे निर्देश देऊन निधी उपलब्ध केला असला तरी स्थानिक पातळीवर अद्याप अपेक्षेप्रमाणे गती नाही. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी कुंभमेळा नियोजनावर लक्ष केंद्रित केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहे. महाजन यांनी आठ महिन्यांत सहा ते सात बैठकांचे आयोजन केले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही तयारीचा आढावा घेतला होता. मात्र, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच हा आढावा बैठक होणार आहे. या वेळी ते कोणत्या मार्गदर्शक सूचना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Raj Thackeray : शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंचं सूचक विधान...मतदार यादीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय म्हणाले?अधिकाऱ्यांची लगबग
भुजबळ सिंहस्थ कुंभमेळ्यासह ‘निमा’, ‘आयमा’ संघटना तसेच येवला तालुक्याशी संबंधित प्रश्नांवरही बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी बुधवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी जय्यत तयारी करत होते. संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक माहिती गोळा करण्यात त्यांचा वेळ गेला.