खंडित वीजपुरवठा सुरळीत; मात्र रस्त्यांची दैना
esakal August 22, 2025 09:45 AM

किवळे, ता.२१ : मागील काही दिवसांपासून किवळे परिसरातील नागरिकांची खंडित वीजपुरवठ्याची समस्या बहुतांशी मार्गी लागली आहे. मात्र, खड्डेमय रस्त्यांचा त्रास अजून त्यांना सहन करावा लागत आहे. त्याकडे महापालिकेचा स्थापत्य विभागाकडून दुर्लक्ष केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
किवळे परिसरातील नागरिकांना विजेचा लपंडाव आणि खड्डेमय रस्त्यांचा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘के व्हिले’ हाउसिंग सोसायटीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. एकूण ७८६ सदनिकांच्या या सोसायटीत कधी दिवसभर वीज नसते. कधी अचानकच जाते. ‘वर्क फ्रॉम होम’ व मुलांचे ऑनलाइन स्कूल विस्कळीत होत आहेत, अशी तक्रार रहिवासी करत होते. मात्र, तेथील वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे. मात्र, भोंडवे वस्तीत वीजपुरवठ्याबाबत तफावत जाणवत आहे. गृहसंकुलांमध्ये वीज उपलब्ध असते. मात्र, शेजारील निवासी भागात पुरवठा खंडित होतो. ही तफावत का निर्माण होते ? याचा महावितरणने शोध घ्यावा, अशी मागणी भोंडवे वस्ती येथील स्थानिक नागरिक गणेश भोंडवे यांनी केली. मात्र, गुरुवारी किवळे, रावेतमधील बहुतांश भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचा दावा महावितरण कंपनीकडून करण्यात आला.
मुसळधार पावसामुळे महापालिकेने अलीकडेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांचे तीन तेरा झाले आहेत. कातळे वस्ती, सांडभोर वस्ती, बापदेव मंदिर परिसर, गावठाण ते कोतवालनगर, मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंप, विकासनगर व साईनगर अंतर्गत रस्ते, कुणाल आयकोनिया परिसर व कोलते पाटील समोरील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे, रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी बाळासाहेब तरस, संदीप ठाकूर यांनी केली आहे.
सांडभोर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी ॲड. शुभांगी तरस यांनी केली. तर रस्त्यांचे डांबरीकरण करताना पीडब्ल्यूडीप्रमाणे निविदेचे फलक दिसत नाहीत. अल्पावधीत रस्त्यांची झालेली दुरवस्था दर्जावर प्रश्न उपस्थित करत आहे, अशी प्रतिक्रिया नवनाथ तरस, मच्छिंद्र तरस, मारुती दांगट, किरण धुमाळ यांनी दिली.

विद्युत खांब पडल्याने काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, तेथे लगेच त्याला उभा केल्याने किवळे, रावेत परिसरातील वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे.
- रत्नदीप काळे, सहाय्यक अभियंता, महावितरण, रावेत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.