डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारताबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी भारताबद्दल बोलण्याची पातळी सोडल्याचे स्पष्ट दिसंतय. भारताला चक्क रशियाचे कपडे धुण्याचे मशीन म्हटले आहे. टॅरिफ 50 टक्के लागू होणार असून याला फक्त सहाच दिवस बाकी असल्याची धमकीही त्यांनी दिलीये. पीटरने म्हटले की, हा अत्यंत फालतू मुद्दा आहे की, भारताला रशियाच्या तेलाची गरज आहे. नवी दिल्ली रिफायनरीतून नफा कमावत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय.
पीटरने पुढे म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेतावणीनंतरही भारत ऐकायला तयार नसल्याने आता त्यांच्यावर 27 ऑगस्टपासून टॅरिफ 50 टक्के लावला जाणार आहे. भारताकडून जिनपिंगसोबत जवळीकता वाढवली जात आहे. भारत कमी किंमतीत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि त्याला रिफाईन करून जगभरात विकतो. एकप्रकारे कपडे धुण्याच्या मशिनसारखे काम करतो आणि मोठा पैसा कमावतो. भारतीय हे रिफायनरी युद्धाला हवा देत असून त्यामधून पैसा कमावत आहेत.
त्यांना तेलाची गरज नाही त्यांना रिफायनर करून नफेखोरी करायची आहे. भारत आम्हाला त्यांच्या वस्तू विकून पैसा कमावतो आणि त्याच पैशातून तेल खरेदी करतो. पण रशिया तेलाच्या पैशातून युक्रेनच्या युद्धासाठी पैसा लावत आहे आणि त्यातून युक्रेनच्या नागरिकांचे जीव जात आहे. हेच नाही पीटरने पुढे म्हटले की, भारत हा टॅरिफचा महाराजा आहे. आम्ही त्यांच्यासोबत करत असलेल्या व्यापारात आमचा फायदा नाहीये. त्यामध्ये अमेरिकी कामगार आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते.
भारत आम्हाला त्यांच्या वस्तू विकतो आणि आलेल्या पैशातून रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यानंतर त्या तेलावर प्रोसेस करून भाव वाढून विकले जाते. पीटर नवारो यांनी केलेल्या विधानानंतर आता भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. फक्त पीटर नवारोच नाही तर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सरकारकडून भारताबद्दल अशी धक्कादायक विधाना सातत्याने केली जात आहेत. भारताविरोधात अमेरिकेकडून पुन्हा एकदा आग ओकण्यात आल्याचे बघायला मिळतंय. दुसरीकडे अमेरिकी कंपन्या या मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठेत पैसा कमावत आहेत.