प्रसिद्ध कॉमेडियन आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते जसविंदर भल्ला यांचं आज सकाळी मोहालीच्या फोर्टिज रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जसविंदर यांनी त्यांच्या अनोख्या विनोदबुद्धीने आणि अविस्मरणीय भूमिकांनी पंजाबी मनोरंजन विश्वात छाप सोडली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पंजाबी फिल्म इंडस्ट्री आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
जसविंदर हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील अशा सेलिब्रिटींपैकी एक होते, ज्यांनी विनोदाला एक नवीन उंची दिली. त्यांच्या विनोदाचं टायमिंग, त्यातील साधेपणा आणि व्यंगांनी परिपूर्ण असे संवाद.. यांनी प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवलं. ‘गड्डी चलती है छलांग मार के’, ‘कॅरी ऑन जट्ट’, ‘जिंद जान’, ‘बँड बाजे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि विनोदाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
जसविंदर भल्ला यांचा जन्म 4 मे 1960 रोजी लुधियानातील दोराहा इथं झाला. ते प्राध्यापकदेखील होते. त्यांनी 1988 मध्ये ‘छनकटा 88’ या चित्रपटातून विनोदी कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘दुल्हा भट्टी’ यामध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पार्थिवावर 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मोहालीतल्या बलंगी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
जसविंदर हे जवळपास तीन दशकांपासून कलाविश्वात कार्यरत होते. त्यांनी ‘जट्ट अँड ज्युलिएट’, ‘कॅरी ऑन जट्ट’, ‘सरदारजी’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. ‘कॅरी ऑन जट्टा’मध्ये त्यांनी साकारलेली अॅडव्होकेट ढिल्लनची भूमिका घराघरात लोकप्रिय झाली. चित्रपटातील छोट्यातल्या छोट्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. जसविंदर हे 2024 मध्ये ‘शिंदा शिंदा नो पापा’ या चित्रपटात शेवटचे झळकले होते. यामध्ये गिप्पी गरेवाल आणि हिना खान यांच्या मुख्य भूमिका होत्या.
जसविंदर भल्ला यांनी चंदीगडमधील ललित कला शिक्षिका परमदीप यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांचा मुलगा पुखराज भल्ला हासुद्धा अभिनेता आहे. सुरुवातील इंजीनिअर म्हणून करणाऱ्या पुखराजने नंतर त्याच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवलं.