लवकरच सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे आणि आता सर्वजण जण ही स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहे. येत्या 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये T20 स्वरूपात होणारी ही स्पर्धा सुरू होणार असून यामध्ये 8 संघ सहभागी होत आहेत. यावेलीही सर्वांचं लक्ष भारतीय संघावर असेल, जे यंदाही विजेतेपदासाठी दावेदार आहेत. टीम इंडियाने गेल्यावेळीही आशिया कप जिंकला होता, मात्र त्यावेळची टीम आणि यावेळी स्पर्धेत खेळणारा संघ यामध्ये बराच फरक असेल. आधीच्या संघातील बरेच खेळाडू यावेळी संघात नसल्याने तो फरक तर पडेलच पण त्याचप्रमाणे संघात यावेळी आणखी एक मोठा बदल होणार आहे . तो म्हणजे टीम इंडियाच्या जर्सीमध्ये .. गेल्या वेळी भारतीय संघाच्या जर्सीवर एक गोष्ट लिहीलेली होती, पण ती यावेळी कदाचित दिसणार नाही. ते म्हणजे टायटल स्पॉन्सर ‘ड्रीम 11’.
भारतीय क्रिकेट संघ 10 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यूएईविरुद्ध सामना खेळणार आहे. या काळात, कर्णधार सूर्यकुमार यादवसह सर्व खेळाडूंच्या निळ्या टी20 जर्सीवर भारताचे नाव, बीसीसीआयचा लोगो आणि आशिया कप 2025 चा लोगो असेल, परंतु ड्रीम 11 चा लोगो त्यात नसण्याची शक्यता आहे. हा लोगो भारतीय जर्सीच्या पुढच्या बाजूला, अगदी छातीवर लिहिलेला असतो, कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कंपनीसोबत टायटल स्पॉन्सरशिप करार केला होता.
ऑनलाइन गेमिंग बिलाचा ड्रीम 11 वर परिणाम
खरंतर, ऑनलाइन मनी गेमिंग म्हणजेच पैसे देऊन पैसे कमवणाऱ्या गेम्सवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत एक विधेयक मांडले होते. ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल 2025’ हे केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन दिवसांत मंजूर केले आणि आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर काही दिवसांत ते कायद्याचे रूप घेईल. त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतात सुरू असलेल्या ऑनलाइन फॅन्टसी गेम्सवर होईल, ज्यामध्ये ड्रीम 11 चा सर्वात जास्त वाटा आहे. क्रिकेटपासून फुटबॉल आणि कबड्डीपर्यंत, ही कंपनी अनेक खेळांमध्ये फँटसी गेम्स चालवते, ज्यामध्ये यूजर्स हे पैसे देऊन भाग घेतात आणि नंतर विजेत्याला त्या बदल्यात पैसे मिळतात. परंतु हे विधेयक कायदा होताच, या खेळांवर बंदी घातली जाईल.
भारतात फॅन्टसी गेम्सच्या वाढत्या व्याप्तीमुळे, ड्रीम 11 सह अनेक कंपन्यांनी त्यात प्रवेश केला होता. आपल्या यशाचा फायदा घेत, ड्रीम 11 ने बीसीसीआय सोबत 358 कोटी रुपयांचा टायटल स्पॉन्सरशिप करार केला, ज्या अंतर्गत भारतीय संघाच्या जर्सीपासून ते प्रशिक्षण किटपर्यंत सर्व गोष्टींवर त्याचे नाव ठळक अक्षरात दिसतं. हा करार 2023 साली झाला होता आणि 2026 पर्यंत चालणार आहे. परंतु या नवीन विधेयकानंतर, ड्रीम 11 ला त्याचा फॅन्टसी गेमिंग व्यवसाय बंद करावा लागेल, तो त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे.
टीम इंडियाला स्पॉन्सर नाही ?
असं झाल्यास ड्रीम 11 या स्पॉन्सरशीप डीलच्या शेवटच्या वर्षाच्या आधी माघार घेऊ शकते अशी भीती आहे. जर असं झाले आणि कंपनीने आशिया कपपूर्वी भारतीय बोर्डासोबतचा करार संपवण्यास सहमती दर्शवली, तसेच या काळात बीसीसीआयने कोणत्याही नवीन कंपनीसोबत करार केला नाही, तर आशिया कप दरम्यान भारतीय संघाच्या जर्सीवर कोणत्याही कंपनीचा लोगो दिसणार नाही. असं झाल्यास BCCI लास कोट्यवधींचं नुकसान होऊ शकतं. सध्याच्या कराराअंतर्गत, बीसीसीआयला द्विपक्षीय (आणि आशिया कप) आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ड्रीम11 कडून ६ कोटी रुपये मिळतात, तर आयसीसी स्पर्धांसाठी ही रक्कम 2 कोटी रुपये आहे, कारण त्यामध्ये स्पॉन्सरचं नाव थेट छातीवर नसून हातावर लिहीलेलं असतं.