खंडाळा घाटातून अवजड वाहतूक बंद
अपघातांच्या घटनांमुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
खालापूर, ता. २१ (बातमीदार)ः मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा घाटात अवजड वाहनांमुळे महिनाभरात तिघांचा बळी, तर १० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे प्रयत्न खोपोली पोलिसांकडून सुरू होते. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत.
खोपोली पोलिस ठाणे हद्दीतून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८) असे दोन महत्त्वाचे महामार्ग जातात. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८) खंडाळा (बोर) घाटातून जातो. हा मार्ग तीव्र चढ उताराचा तसेच धोकादायक वळणाचा असल्याने जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गंभीर अपघात घडून निष्पापांना जीव गमवावे लागले होते. याच अनुषंगाने महामार्गावरून जड-अवजड वाहतूक बंदीबाबत खोपोलीचे प्रभारी पोलिस अधिकारी खोपोली सचिन हिरे यांनी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांना कळविले होते. तसेच कारखानदारांशी संवाद साधत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता.
--------------------------------------------
घाट तीव्र चढउताराचा वळणाचा असल्याने महामार्गावरून जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक होते. टोलचे पैसे वाचवण्यासाठी काही चालक धोकादायक मार्गाचा अवलंब करत होते. त्यामुळे अपघात झाले होते.
- दत्ता शेडगे, गारमाळ खंडाळा घाट
-------------------------------------
महामार्गावरील अपघाताच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून या महामार्गावरून जड-अवजड वाहतूक बंद केली आहे. तसेच मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर अवजड वाहतुकीकरिता मिसिंग लिंक प्रस्तावित आहे.
- सचिन हिरे, पोलिस निरीक्षक, खोपोली