सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. आधीच कर्जाचं ओझं, त्यात मुसळधार पावसामुळे पिकाचं झालेलं नुकसान या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्रासात असलेल्या बळीराजाला मदतीची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आशा आहे ती, कर्जमाफीची. मागच्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी कधी होणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.
“आता लाडकी बहिण आणि वीज माफीवर काम सुरु आहे. कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात होती. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ” असं अजित पवार म्हणाले. “योग्यवेळ कधी येणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर योग्यवेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना” असं उत्तर अजित पवारांनी दिलं. “आमच्या जाहीरनाम्यात होतं. एकंदरीत राज्यकारभार करताना सर्व गोष्टींचा विचार करुन पुढे पावलं उचलावी लागतात. आमच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलय. योग्यवेळ आल्यावर निर्णय घेऊ” असं अजित पवार म्हणाले.
‘सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील’
“आज सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. गणेशोत्सव महायुतीने राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक उत्साहात यंदा गणेशोत्सव होईल, राज्यातील सगळी यंत्रणा झोकून देऊन काम करणार आहे. सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहील, शेवटच्या दिवशी सगळा दिवस चालू राहील” असं अजित पवार म्हणाले.
‘आज लोगो तयार केला’
“मानाचे गणपती, कुठल्या स्टेशनला कुठे चढावे आणि उतरावे याबाबत सुद्धा नियोजन करणार आहोत. पुणे ग्रँड चॅलेंज टूरमध्ये दोन्ही पालिका, जिल्हा परिषद, अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचे काम होणार आहे तसेच आज लोगो तयार केला आहे. पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारने हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतला आहे” असं अजित पवार म्हणाले.
‘त्यांना योग्य मोबदला देणार आहोत’
“काही गावांमध्ये 1285 एकर जमीन भूसंपादन सहमती पत्र सादर करण्याकरिता सूचना देऊन अंमलबजावणी सुरू करतील. काही लोकांचा विरोध आहे. चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. भूसंपादन करतो आहे, तिथे कुठली ही गाव जात नाहीत. पण काही घरं जात आहेत, त्यांना योग्य मोबदला देणार आहोत” असं अजित पवार म्हणाले.
रेड अलर्ट धोका टळला आहे
“पश्चिम महाराष्ट्रामध्ये माणिक डोह मध्ये पाणी कमी आहे, त्याबद्दल सर्व्हे झाला आहे. धरणे भरलेली आहेत. अत्यंत बारकाईने लक्ष ठेऊन आम्ही आहोत. रेड अलर्ट धोका टळला आहे. ठराविक घाट माथ्यावर लालसरपणा दाखवला आहे. पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. तिथे पंचनामा करायला सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच सुद्धा बारकाईने लक्ष आहे भीतीचे कारण राहिलेलं नाही. पाऊस पडताना जिथे पाणी साठलं आहे. तिथे राहू नये म्हणून काळजी घेतली जाईल” असं अजित पवार म्हणाले.