आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी मोदी सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला कडाडून विरोध केला जात होता. आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारताने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी करण्यात येत होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला दिवसेंदिवस विरोध वाढत होता. त्यामुळे हा सामना होणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. मात्र केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने 21 ऑगस्टला धोरण जाहीर केलं. त्यानुसार भारतीय संघाला सर्वच स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यापासून रोखता येणार नसल्याचं म्हटलं. मात्र दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका होणार नसल्याचंही क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं.
केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सामन्याला दहशतवादी हल्ल्यानंतरही परवानगी दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्ष-नेते, नेटीझन्स आणि काही आजी माजी खेळाडूंनीही या सामन्याबाबत नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारी यानेही संताप व्यक्त केलाय. या निर्णयामुळे लोकांच्या जीवाची कोणतीच किंमत नाही. तसेच भारत-पाकिस्तान सामना होणार, यावर माझा विश्वास बसत नाही, असं मनोज तिवारीने म्हटलं. मी हा सामना पाहणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होत असेल तर हे आश्चर्यकारक आहे, असं मनोज तिवारी म्हटलं.
“हा सामना होतोय त्यामुळे मी हैराण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निष्पापांचे जीव गेले. त्यानंतर युद्ध झालं. त्यानंतर चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतरही काही महिन्यांनी सर्व गोष्टींचा विसर पडलाय. हा सामना होणार यावर मला विश्वास बसत नाहीय. माणसांच्या जीवाची काहीच किमत नाही. पाकिस्तान विरुद्ध खेळून तुम्ही काय सिद्ध करणार? माणसांच्या जीवाची किंमत खेळापेक्षा जास्त असायला हवी. मी हा सामना पाहण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही”, असं मनोजने म्हटलं.
मनोजने भारताचं 12 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र मनोजला दुर्देवाने भारतासाठी कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच मनोज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10 हजारापेक्षा जास्त धावा केल्या. तसेच मनोजने प्रोफेशनल करियरमध्ये एकूण 36 शतकं झळकावली.
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 14 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.