दिवंगत राकेश झुनझुनवाला हे भारताचे बिग बुल म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारातील ते मोठे महारथी होते. त्यांच्या टिप्स फॉलो करून अनेक जणांनी शेअर बाजारातून मोठी कमाई केली. आजही अनेक जण त्यांना गुरू मानतात. त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी सुद्धा पतीसारखीच बाजारात चुणूक दाखवली. त्यांनी एक मोठा डाव स्वतःच्याच पारड्यात टाकला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्यापूर्वीच त्यांनी बाजी पलटवली आणि बंपर कमाई केली. तुम्ही सुद्धा आश्चर्याने तोंडात बोट घालाल.
योग्य वेळी योग्य निर्णय
शेअर बाजारात वेळेला मोठी किंमत असते. तुम्ही योग्य वेळी कोणता निर्णय घेता याला फार महत्त्व आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी असाच एक निर्णय घेतला. जून 2025 मध्ये ऑनलाईन रिअल मनी गेमिंग कंपनी नजारा टेक्नॉलॉजीचे सर्व शेअर विकून त्यांनी मोठी कमाई केली. त्यानंत या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. सरकारने आणलेल्या नियमांचा परिणाम कंपनीवर झाला. त्यापूर्वीच रेखा झुनझुनवाला यांनी चुणूक दाखवत शेअर विक्री करून कमाई केली.
334 कोटी रुपयांची कमाई
रेखा झुनझुनवाला यांच्या या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे. सरकारच्या निर्बंधामुळे नजारा टेकचा शेअर एका आठवड्यातच जवळपास 13 टक्के घसरला. तो 1,167 रुपयांपर्यंत आला. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसात या शेअरमध्ये 16.3 टक्क्यांची घसरण झाली. मार्च 2025 पर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीत 7.06 टक्क्यांचा वाटा होता. त्यांच्याकडे जवळपास 61.8 लाख शेअर होते. 13 जून 2025 रोजी त्यांनी हे सर्व शेअर सरासरी 1,225 रुपये प्रति शेअरच्या भावाने विक्री केले. या सौद्यातून त्यांना जवळपास 334 कोटी रुपयांची कमाई झाली. राकेश झुनझुनवाला हयात असताना त्यांच्याकडे 10.82 टक्क्यांपर्यंत वाटा होता. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आता या कंपनीचा एकही शेअर शिल्लक नाही.
सरकारच्या सक्तीचा मोठा फटका
केंद्र सरकारने ऑनलाईन रिअल मनी गेमिंगवर सक्ती आणली. नजारा टेकचा या गेमिंग क्षेत्राशी 44 टक्क्यांच्या घरात व्यवसायिक वाटा होता. या निर्णयाचा फटका लागलीच कंपनीवर दिसला. कंपनीकडे परदेशी क्लाईंट पण आहेत. पण देशातील या बदलाचा कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला. बाजारातील ही हालचाल अगोदरच ओळखून रेखा झुनझुनवाला यांनी त्या पण एक कसलेल्या खेळाडू असल्याचे दाखवून दिले.