Ahilyanagar News: 'श्रीगोंदे नगरपरिषद निवडणुकीच्या हालचाली गतिमान'; इच्छुकांची संख्या मोठी, आरक्षण ठरवणार अनेकांचे भवितव्य
esakal August 23, 2025 02:45 PM

-समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे : नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. तेव्हापासून राजकीय हालचाली चांगल्याच गतिमान झाल्या आहेत. विशेषतः नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र, या सर्वांचे भवितव्य आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणर आहे. सध्या सर्वांनी जोरदार तयारी चालवली आहे.

MLA Kashinath Date: अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी: आमदार काशिनाथ दाते; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

तालुक्याच्या राजकारणात श्रीगोंदे शहरातील मतदारांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळे श्रीगोंदे नगरपरिषद निवडणुकीचे महत्त्व अधिक वाढते. त्यातच मागील काळात ही निवडणूक नेमकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत होती. त्यामुळे या निवडणुकीचे महत्त्व अधिकच वाढले होते. मात्र, यावेळी वेळेत निवडणुका न झाल्याने गेली दोन वर्षे नगरपरिषदेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास वर्षभराने ही निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपरिषद निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुकास्तरीय नेते कशी भूमिका घेतात ही पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील प्रमुख नेते नगरपरिषद निवडणुकीबाबत वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत असले, तरी इच्छुकांनी मात्र जोरदार तयारी चालवली आहे.

नगराध्यक्ष निवड जनतेतून होणार असल्याने अनेकांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकियेत आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यातच नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी देताना आर्थिक निकष निर्णायक ठरणार आहेत. त्यानुसारच उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावरील अपात्रतेचा ठराव व उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या वेळी घडलेल्या घडामोडींचे परिणाम येत्या निवडणुकीत पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवताना देखील याबाबी निर्णायक ठरू शकतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये दुरवलेली व आमनेसामने आलेली मंडळी एकत्र आणायची ठरल्यास नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

Ahilyanagar News: 'जळकेवाडीतील सर्जा-राजाची जोडी बनली पावणे कुटुंबाची सदस्य'; पन्नास वर्षांपासून तिसऱ्या पिढीत सुद्धा जीवापाड जपताहेत

या नगरपरिषद निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची सध्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याचवेळी नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षांकडून ओबीसी उमेदवार पुढे आणून तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून गणित जुळवता येईल का? याचीही काहीजण चाचपणी करीत आहेत. ही सगळी गणिते बाजूला ठेवून इच्छुकांनी आपापल्या पातळीवर तयारी चालवली आहे. इच्छुकांमध्ये जुन्या मंडळींसह तरुणांची संख्याही मोठी आहे. त्यातच प्रभाग व नगरसेवकांची संख्या वाढल्याने नव्या मंडळींना संधी मिळण्याची अपेक्षा लागली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण नगरपरिषद निवडणुकीच्या चर्चांनी ढवळून निघाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.