डिजिटल युगात सतर्क राहणे आवश्यक : अतुल झेंडे
फसवणूक टाळण्यासाठी सावधानता, पोलिसांसोबत सहकार्याचे आवाहन
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : सध्याच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनोळखी व्यक्तीकडून आलेले कॉल, मेसेज किंवा ऑनलाइन प्रलोभनांना बळी पडल्याने अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडत आहेत. यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन कल्याण परिमंडळ -३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले.
प्रेस क्लब, कल्याण यांच्यावतीने शनिवारी (ता. २३) आचार्य अत्रे कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित विशेष संवाद सत्रात झेंडे बोलत होते. या कार्यक्रमात प्रेस क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्ष पदार्पणाची घोषणा करण्यात आली आणि नवीन लोगोचे अनावरण झेंडे यांच्या हस्ते पार पडले. झेंडे यांनी नागरिकांना आवाहन केले, की अनोळखी नंबरवरून येणाऱ्या ओटीपी, लिंक, बँक संबंधित माहिती विचारणारे कॉल/मेसेज याकडे दुर्लक्ष करावे. पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत.
शाळा, महाविद्यालयांमध्ये अमलीपदार्थांविषयी ‘पोलिस दादा-पोलिस दीदी’ उपक्रमांतर्गत मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात असून, विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता वाढवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. ‘डायल ११२’वर संपर्क साधणाऱ्या नागरिकांची मदत तत्काळ पोहोचविण्यासाठी कल्याण परिमंडळ ३कडे स्वतंत्र वाहने उपलब्ध असून, सरासरी रिस्पॉन्स टाइम फक्त सात मिनिटे असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद मोरे, कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे, सचिव विष्णुकुमार चौधरी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब उघडे, रमेश दुधाळकर आणि विनायक बेटावदकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रेस क्लब, कल्याणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात जाहीर करण्यात आली. यावर्षी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिताविषयक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले.
सीसीटीव्हीचा प्रभावी वापर
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरत असून, दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर रस्त्याकडे तोंड असलेला कॅमेरा बसवावा, असे आवाहन झेंडे यांनी केले. कल्याण-डोंबिवली परिसराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता, कल्याण पूर्व आणि काटई नाका येथे नवीन पोलिस ठाण्यांची मागणी शासनाकडे पाठविण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फोटो ओळ
कल्याण : पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या नवीन लोगोचे अनावरण करताना उपस्थित मान्यवर.