रोहा तालुक्यात नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम
esakal August 25, 2025 07:45 AM

रोहा तालुक्यात नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम
१५०० एकरवर गट शेती प्रकल्प; जैवइंधननिर्मितीमुळे ऊर्जा क्षेत्रालाही चालना
रोहा, ता. २४ (बातमीदार) : पारंपरिक शेतीतील मर्यादित उत्पन्नामुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर जाऊन पर्यायी रोजगार शोधत आहेत. अशा परिस्थितीत स्वाध्याय शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, रोहा आणि गोडबोले नॅचरल्स अँड डेअरी फार्म्स एलएलपी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना ऊर्जा पिकांच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पारंपरिक भातशेतीपेक्षा जास्त उत्पन्न देणारा पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच निसर्गाचा समतोल राखत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. नेपियर गवत हे एक महत्त्वाचे ऊर्जा पीक असून, त्यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस, इथेनॉल आणि बायोमास पेलेट्स तयार करता येतात. भारत सरकारने जैवइंधन धोरणाअंतर्गत बायोसीएनजी उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नेपियर शेतीला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
या प्रकल्पाअंतर्गत प्राथमिक टप्प्यात रोहा तालुक्यातील खारगाव, आरे खुर्द, आरे बुद्रुक, खारी, तारेघर, झोळांबे, भातसई, शेणवई, वावेपोटगे, वावेखार या गावांमध्ये शेतकरी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीत ‘ऊर्जा पीक शेतीचे फायदे आणि भविष्य’ या विषयावर मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती स्वाध्याय शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक जितेंद्र जोशी आणि गोडबोले नॅचरल्सचे सुधांशु गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
......................
रोहा येथे पहिल्यांदाच १५०० एकर क्षेत्रावर क्लस्टर विकास आणि गट शेती प्रकल्प राबविण्यात येणार असून, संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाईल. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ म्हणून प्रति एकर दरवर्षी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ठिबक सिंचन अनुदानाचे फायदे आणि गट शेतीतून होणारा खर्च बचत हेसुद्धा महत्त्वाचे लाभ असतील. या प्रकल्पामुळे लहान शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळेल, तसेच जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. भारतात जैवइंधननिर्मिती वाढवून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे मत प्रकल्प आयोजकांनी व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.