गणेशोत्सव मंडळातर्फे 'एक वही, एक पेन उपक्रम'
esakal August 25, 2025 08:45 AM

गणेशोत्सव मंडळातर्फे ‘एक वही, एक पेन उपक्रम’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : सांताक्रूझ पूर्वेकडील शिवशक्ती सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रणित गोविंद भाऊ सहाय्यता कक्ष व श्री लिंग माउली प्रासादिक भजन मंडळाच्या सहकार्याने ‘एक वही, एक पेन’ हा उपक्रम राबवला जात आहे. हे या उपक्रमाचे आठवे वर्ष असून, गणेशोत्सवात सामाजिक भान जपले पाहिजे, याचे उत्तम उदाहरण या मंडळाकडून देण्यात आले आहे. गेली सात वर्षे सातत्याने मंडळाने वंचित व दुर्बल स्तरातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला आहे.
गणेशभक्तांनी गणरायाच्या दर्शनासाठी येताना हार, नारळ व प्रसाद अर्पण करण्याऐवजी एक वही, व एक पेन, पेन्सिल एक स्कूल बॅग इत्यादी शैक्षणिक साहित्य बाप्पाच्या चरणी अर्पण करावे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन २०१६ पासून गणेशोत्सव काळात ‘एक वही व एक पेन’ हा सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. हे संकलित केलेले साहित्य गुरुमाउली बुवा श्रीधर मुणगेकर यांच्या हस्ते वंचित गरजू कुटुंबातील मुलांना वितरित केले जाईल, तर गणेशोत्सवादरम्यान दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला एक वही व एक पेन घेऊन येण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.