Satara News: 'अखेरच्या क्षणापर्यंत नाही सुटली साथ'; तळबीडला पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडला श्वास, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त
esakal August 25, 2025 09:45 AM

वहागाव : पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही काल (गुरुवार) अशीच घटना घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही श्वास सोडल्याने हळहळ व्यक्त झाली.

धक्कादायक! 'संगमनेर तालुक्यात कुत्र्यांचे भांडण, मालकांमध्ये वाद; कुऱ्हाडीच्या घावाने कुत्रा जखमी, ‘कुत्र शेळ्यांवर धावलं अन्..

कऱ्हाड तालुक्यातील तळबीड गावात गुरुवारी (ता. २१) घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांनाही अचंबित केले. दिनकर मारुती खोत (वय ९७) व अनुसया दिनकर खोत (वय ९०) असे निधन झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास दिनकर खोत यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांच्या फरकात त्यांच्या पत्नी अनुसया यांनीही अखेरचा श्वास घेतला. हाडाचा शेतकरी अशी दिनकर खोत यांची गावात ओळख आहे. शेतीत काबाडकष्ट करून त्यांनी संसार फुलवला.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पत्नी अनुसया यांची शेवटपर्यंत त्यांना साथ मिळाली. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यानंतर सून आणि दोन नातवंडांना त्यांचा आधार होता. वयाच्या नव्वदीनंतरही त्यांनी एकमेकांना साथ दिली.

आजच्या समाजात पतीचे निधन झाले, तर पत्नीचे अन् पत्नीचे निधन झाले, तर पतीचे हाल होतात, हे विदारक चित्र आहे. मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही, असे अनेकजण म्हणतात; परंतु हे नाते किती टिकणार? हे वेळेच्या हातात असते; परंतु तळबीड येथील घटनेने एकमेकांवर असलेल्या अपार प्रेमाची प्रचिती दिली.

Ahilyanagar fraud:'अहिल्यानगरमध्ये शेअर मार्केटच्या नावे ५० लाखांची फसवणूक'; नफ्याचा आमिष नडला, दोघांविरुध्द गुन्हा नातवांकडून मुखाग्नी

घटना कळताच तळबीड ग्रामस्थांनी खोत दांपत्याच्या घरी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. एकाच वेळी दोघांनी प्राण सोडल्याने नातेवाईक, पै- पाहुणे व गावकऱ्यांना गहिवरून आले. एकत्रित काढलेल्या अंत्ययात्रेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेजारी- शेजारी दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या आजी- आजोबांना नातवांनी मुखाग्नी दिला. आज (शुक्रवार) त्यांचा रक्षाविसर्जन विधी झाला. मात्र, या आकस्मित घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.