बोईसर, ता. २४ (बातमीदार) : बोईसरमधील सिडको बायपास हा एक महत्त्वाचा रस्ता असून, तारापूर आणि नवापूर रस्त्याला जोडतो. औद्योगिक परिसरात जाणाऱ्या कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी टाळता येते आणि कमी वेळेत प्रवास करता येतो. या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी, निधीअभावी काही भाग प्रलंबित होता आणि अलीकडेच कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २३) रात्री आणि रविवारी (ता. २४) पहाटे सिडको बायपासवरील काँक्रीट रस्त्यावर चिखल आला होता. त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने दोन तासांत जवळपास सहा दुचाकींचा अपघात झाल्याने १२ ते १३ दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बोईसर शहरातील चित्रालय रस्त्याला जोडणारा सिडको बायपास रस्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी संबंधित विभागाने पावसाळा सुरू होताच करणे गरजेचे आहे, पण त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे बोईसरकरांचा सूर आहे. याच रस्त्यावर गेल्या वर्षी २७ आणि २८ जुलै २०२४ रोजी ३१ दुचाकीस्वार पडले होते. आता नवीन बनवलेल्या काँक्रीट रस्त्यावर दोन तासांत पाच दुचाकींचे अपघात झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी खराब रस्त्याच्या बांधकामावर नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
महामार्गावर मेंढवण येथे अपघातात चालक जखमी
कासा (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंडवण येथील अपघाती वळणावर रविवारी (ता. २४ ) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पिकअप टेम्पोचालक जखमी झाला. पिकअप (क्र. जीजे १९ वाय ७४९१) हा गुजरातकडे जात असताना पुढे जाणाऱ्या एका वाहनाला पाठीमागून धडकला. यात चालक अखिलेश सोनी (वय ३०, रा. फैजाबाद, उत्तर प्रदेश) याच्या छातीला मार लागल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घटनास्थळी पोलिस पोहोचण्याआधी महामार्ग प्राधिकरणाच्या पथकाने रुग्णवाहिनेने त्याला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती महामार्ग सुरक्षा पेट्रोलिंग पथकाने पोलिसांना दिली. अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक प्रकाश बसवत व अंमलदारांनी भेट दिली. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन टोल प्राधिकरणच्या क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.