गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी
esakal August 25, 2025 09:45 AM

गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी
महावितरणचे आवाहन; घरगुती दराने तात्पुरता वीजपुरवठा उपलब्ध
कणकवली, ता. २४ः गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांर्भियाने उपाययोजना कराव्यात. तसेच घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, याकरता गणेश मंडळानी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महावितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीज पुरवठ्याच्या वीजदरानेच वीजदर निश्चित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सवात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही. याची खबरदारी घ्यावी.

चौकट
गणेश मंडळांसाठी महावितरणकडून सुचना...
मंडप, रोषणाई व देखावे उभारताना लघुदाब व उच्चदाब वाहिन्या, वितरण रोहित्रे यापासून सुरक्षित अंतर राखावे.
वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल वापरावा.
वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्युट्रलमुळे अपघाताची शक्यता असल्याने काळजी घ्यावी.
वीज खांबावरून किंवा वाहिन्यांवरून अनधिकृत वीजपुरवठा घेऊ नये; यामुळे जीवित व वित्त हानी होऊ शकते.
वापरणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खात्री करावी.
तुटलेल्या, लूज किंवा ठिकठिकाणी जोड असलेल्या वायर वापरू नयेत.
वायरीस जोड देताना प्रमाणित इन्सुलेशन टेप वापरावी.
भक्तांच्या सुरक्षेसाठी वीज सुरक्षा उपाययोजनांबाबत तडजोड करू नये.
तात्पुरत्या जोडणीसाठी अनामत रक्कम मंजूर वीजभारानुसार भरणे बंधनकारक.
अनामत रक्कम ऑनलाईन भरावी; उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वजा करून शिल्लक परत दिली जाईल.
आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी शाखा अभियंत्यांचा मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावा.
गरज भासल्यास महावितरणचा २४ तास टोल फ्री क्रमांक वापरावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.