Nagpur Cyber Fraud: पार्सलच्या बहाण्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक; सव्वा तीन लाखाने घातला गंडा
esakal August 25, 2025 09:45 AM

नागपूर : बहिणीला जबलपूरला पाठविलेले पार्सल पोहचले नसून ते पोहचून देण्यासाठी पाठविलेल्या लिंकद्वारे सेवानिवृत्त परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याला सव्वा लाखाने घातला गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून सायबर चोरट्याविरोधात फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नरेश श्यामलालजी राजाभोज (वय ७६, रा. अरीहंत आर्केड, मंगलधाम सोसायटी, सिम टाकळी) यांनी राखीच्या निमित्ताने जबलपूर येथे राहणाऱ्या बहिणीला पोस्टाच्या पार्सलने साडी पाठविली. नऊ ऑगस्टला त्यांना ७८२८७७००६२ क्रमांकावरून फोन आला.

त्याने स्वतःला पोस्टातून बोलत असल्याचे सांगून नरेश यांना कुठले पार्सल पाठविले आहे का?अशी विचारणा केली. त्यांनी होकार देताच, ते पार्सल अद्याप पोहचले नसल्याची माहिती देत, ते आजच्या आज पोहचून देतो अशी बतावणी केली. त्यासाठी एक नंबर पाठवितो, त्या क्रमांकावर पैसे पाच रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले.

काही वेळात त्यांच्या मोबाइलवर लिंक आली. ती लिंक क्लिक करताच, नऊ ऑगस्टला सुरुवातीला त्यांच्या बॅंक खात्यातून नऊ हजार आणि त्यानंतर सायंकाळी ३९ हजार रुपये आणि रात्री ९५ हजार रुपये डेबीट करण्यात आले.

Nagpur Police : ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत १८८ जणांवर कारवाई, ६५८ आरोपीच्या रेकॉर्डची तपासणी; ३७५ आरोपींचा रेकॉर्ड केला अद्ययावत

दुसऱ्या दिवशी १० ऑगस्टला दोनदा ४९ हजार आणि त्यानंतर पाच, ४१ आणि ४५ हजार असे एकूण ३ लाख २३ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले. फसवणूक झाल्याचे कळताच, दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ११८(४), ३१८(४), ३१९(२) भा.न्या.सं., सहकलम ६६(क), ६६(ड) आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.