पिंपरी, ता. २४ : रावेत येथील अराइज इंटरनॅशनल स्कूलने ‘रोबोटिक्स’ विषयासाठी प्रतीविद्यार्थी अतिरिक्त दोन हजारांचे शुल्क आकारले आहे. पालकांनी याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. याची दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शाळेला नोटीस बजावली आहे.
‘अराइज’ शाळा व्यवस्थापनाने पालकांना न सांगता दोन हजार रुपयांची बेकायदेशीर शुल्क कपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ‘रोबोटिक्स’ हा विषय एलकेजी ते दुसरीसाठी कधीच शिकवला गेला नाही, तरीही शाळेने ‘जोडो’ या बाह्य संस्थेच्या माध्यमातून पालकांच्या खात्यातून थेट रक्कम वसूल केली. शुल्क नियंत्रण कायद्याच्या नियमांचे हे उघड उल्लंघन आहे, असा आरोप पालकांनी केला आहे.
नियमाप्रमाणे फीवाढ केवळ तीन वर्षांनी करता येते, मात्र शाळेने अनधिकृत शुल्क लादले. कायद्यानुसार पालकांनी थेट शाळेकडेच फी भरायची असते. तरी शाळेने ‘जोडो’सारख्या बाह्य संस्थेला प्रवेश दिला. डिजिटल सपोर्ट सिस्टिम, एमसीएफ, थेट्रिका यांसारख्या न शिकवलेल्या विषयांसाठी पालकांकडून पैसे उकळले गेले. दरवर्षी नवीन गणवेश व पुस्तकांची सक्ती करून पालकांवर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले जाते, असा आरोप काही पालकांनी केला आहे.
पालकांनी शाळेत धाव घेतल्यावर मुख्याध्यापक, लेखापाल व जोडो प्रतिनिधींनीही कबूल केले की, रोबोटिक्स हा विषय प्रत्यक्षात फक्त ३री ते ५वी इयत्तेसाठी आहे. तरीदेखील पालकांकडून कपात केली गेलेली रक्कम पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे उघड झाले.
- अर्चना सुराणा, सामाजिक कार्यकर्त्या
शाळा व्यवस्थापनाने पालकांना न सांगता दोन हजार रुपये शुल्क कपात केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाला कळविले आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- पत्रलेखा मुखर्जी, मुख्याध्यापिका, अराईज इंटरनॅशनल स्कूल