Group D Exam : घाटीच्या पदभरती परीक्षेत २८ टक्के उमेदवारांची दांडी
esakal August 26, 2025 08:45 PM

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) येथे गट ‘ड’च्या ११ संवर्गातील ३५७ पदांसाठी राज्यभरातून २० हजार ४६७ उमेदवारांची व्यवस्था २७ केंद्रांवर करण्यात आली होती.

राज्यभरातील ११ शहरांतील २७ केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा १४ हजार ६५३ उमेदवारांनी दिली. ५ हजार ८१२ (२८.४० टक्के) जणांनी परीक्षेला दांडी मारली. ऑनलाइन परीक्षेसाठी केंद्रावर उशिरा पोचलेल्या उमेदवारांना मात्र परीक्षेपासून मुकावे लागले. तसेच नागपूर येथे एका उमेदवारावर गुन्हा नोंदविण्यात आला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, नोडल ऑफिसर डॉ. भारत सोनवणे यांनी चिकलठाणा एमआयडीसी आणि सुराणानगर येथील केंद्रावर भेट देत आढावा घेतला.

नागपूर येथील केंद्रावर एका उमेदवाराच्या कानात मायक्रो इअरबर्ड आढळून आला. त्या उमेदवारावर नागपूर येथे गुन्हा नोंदवण्यात आला. त्याशिवाय सर्व केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी विविध जिल्ह्यांतील उच्च शिक्षित उमेदवार सरकारी नोकरीच्या आशेने चतुर्थश्रेणी पदांसाठी पालकांसह शहरात दाखल झाले होते.

शहरातून आलेले काही उमेदवार सकाळी साडेआठनंतर चिकलठाणा एमआयडीसीतील केंद्रावर दाखल झाले. परीक्षेला वेळ असल्याने प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली. प्रवेशद्वारावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना विचारणा केली. परंतु त्यास नकार देण्यात आला. त्यामुळे उमेदवार, नातेवाइकांनी तीव्र रोष व्यक्त केला. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी दिलीप गोधणे, शेख नईम, वरिष्ठ लिपिक अभिजित भोरे आदींनी परिश्रम घेतले.

Chh. Sambhajinagar: सिडको खून प्रकरण, पालकमंत्री शिरसाट माघारी फिरताच एकाचे कृत्य; प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की, कानशिलात लगावली तिन्ही केंद्रांवर परीक्षा सुरळीत

पहिली शिफ्ट ९ ते ११, दुसरी शिफ्ट १ ते ३, तर तिसरी शिफ्ट ५ ते ७ दरम्यान असून संभाजीनगरशहरात तीन केंद्रांवर परीक्षा पार पडली. मंगळवारी (ता. २६) ३,३७० उमेदवार, तर २८ ऑगस्ट रोजी ४१८ उमेदवारांचे नियोजन आहे. सामान्य ज्ञान, गणित-बुद्धिमत्तेच्या प्रश्नांनी घाम फोडला. तर मराठी, इंग्रजी विषयांचे प्रश्न सोपे होते. मात्र, अनेकांचे वेळेचे गणित चुकल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. २०० गुणांच्या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग नव्हती. त्यामुळे पूर्ण पेपर सोडवण्यास अनेकांना वेळ पुरला नसल्याचे परीक्षार्थी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.