मोठी बातमी! मनसे, शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक; युतीबाबत काय निर्णय होणार? पडद्यामागे घडामोडींना वेग
Tv9 Marathi August 27, 2025 01:45 AM

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात तब्बल वीस वर्षानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंदू एकाच व्यासपीठावर आल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती, त्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तर या चर्चेनं चांगलाच जोर पकडला, आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणेशोत्सवाचं देखील निमंत्रण दिलं आहे.

दरम्यान त्यापूर्वी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं युती केल्याचं पहायला मिळालं. ही निवडणूक मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं युतीमध्ये लढवली मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा पराभवाचा धक्का बसला, 21 जागांपैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही, त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान आता नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे  मालेगावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे,  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक महत्त्वाची बैठक पार पडली.  मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेल्या या बैठकीत हे दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एकत्र आले असून, आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या स्थानिक पातळीवरील संघटनांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मालेगावमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये बैठक पार पडली आहे. मालेगावच्या महापालिका निवडणुकीत या नव्या समीकरणामुळे मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  या बैठकीला मनसे व  शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी, तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.