Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना अखेर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी मिळालेली आहे. ही परवानगी देताना जरांगे यांना एकूण आठ अटी घालण्यात आल्या आहेत. जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात येणार आहेत. या आंदोलनासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक असून काहीही झालं तरी मी मुंबईत धडकणारच, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आल्यावर मी बेमुदत उपोषण करणार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. सरकारने मात्र मोठी खेळी खेळली असून त्यांचे उपोषण फक्त एका दिवसावर आणण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
सरकारने नेमका काय आदेश दिला?जरांगी यांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता राज्य सरकारने त्यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी मुंबईत आलो तर परत माघारी फिरणार नाही. तिथे बेमुदत उपोषण करणार आहे, असे जरांगे यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता ते मुंबईला निघाले आहेत. सध्या मुंबईत गणेशोत्सवामुळे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली होती. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम असून न्यायालयात दाद मागू असे जरांगे यांनी जाहीर केले होते. त्यांनी मुंबईकडे कूच केल्याने आता राज्य सरकारने त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. हे आंदोलन त्यांना फक्त सकाळी दहा ते सायंकाली सहा वाजेपर्यंतच करता येणार आहे. वेळ संपल्यानंतर जरांगे यांना त्यांचे आंदोलन थांबवावे लागणार आहे.
फक्त एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगीविशेष म्हणजे आझाद मैदानाची क्षमता ही 5000 लोकांची आहे. तिथे इतरही आंदोलक आहेत. त्यामुळे 5000 लोकांपेक्षा जास्त लोक तिथे जमा होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याचेही सरकारने जरांगे यांना सांगितले आहे. जरांगे बेमुदत उपोषणाचा निर्धार करूनच आंतरवाली सराटीहून निघालेले आहे. तशी तयारी करून येण्याचे त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेले आहे. सरकारने मात्र त्यांचे हे आंदोलन फक्त एका दिवसावर आणून ठेवले आहे. सायंकाळी 6 वाजेनंतर आंदोलकांना आझाद मैदानावर थांबता येणार नाही, असेही सरकारने जरांगे यांना सांगितले आहे. सरकारने मुंबईतील गर्दीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी असा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे नवा पेच तर निर्माण होणार नाही ना? जरांगे यांचे समर्थक मुंबईत दाखल झाल्यावर नेमकं काय होणार? असं विचारलं जात आहे.