दिव्यांग बालकांसाठी
सावंतवाडी येथे शिबिर
सिंधुदुर्गनगरीः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत २ ऑक्टोबरला सावंतवाडीत दिव्यांग बालकांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक पार पडली. जिल्ह्यातील दिव्यांग मुलांचे सर्व्हेक्षण करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, यूनिक डिसेबिलिटी ओळखपत्र तसेच वैद्यकीय तपासणीसारख्या सेवा देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. या शिबिरात आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग विभाग, जिल्ह्यातील शासकीय शाळा, स्वयंसेवी संस्था (NGO) यांसह विविध विभागांचा सहभाग असणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी, तसेच तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी, कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, दोडामार्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा.
-----------------
गिग, प्लॅटफॉर्म कामगारांना
नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पात्र गिग कामगारांनी register.eshram.gov.in या लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी केले आहे. खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर तसेच इतर गिग कामगारांना सामाजिक संरक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून, गिग कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.
---------------
सोहन शारबिद्रे
यांची निवड
सावंतवाडीः ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी सोहन शारबिद्रे यांची निवड करण्यात आली आहे. ते गेली चार वर्षे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही निवड जाहीर करण्यात आली. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, प्रणय बांदिवडेकर आणि जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी केली.
---------------
गणेश पूजन साहित्याचे
वालावलकरांकडून वाटप
वेंगुर्लेः गणेश चतुर्थीनिमित्त वेंगुर्ले शहर कार्यक्षेत्रातील कुटुंबांना शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या माध्यमातून गणेश पूजन साहित्य वाटप करण्यात आले. शिवसेना कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन देसाई, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, विभागप्रमुख नयन पेडणेकर, अमित गावडे, संजय परब, सागर गावडे यांची उपस्थिती होती.
----------------
दोडामार्गच्या कराटेपटूंची
यशस्वी कामगिरी
दोडामार्गः गोवा कराटे व फिटनेस सेंटरतर्फे आवेडे–बोरी येथे आयोजित ओकिनवा मार्शल आर्ट्स अकादमी व जपान कराटे शोटोकाई कराटे स्पर्धेत दोडामार्गच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत ६०० हून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. दोडामार्ग येथील वंश कुंभार, तृष्टी मणेरीकर, मुस्तकीर सय्यद, मृणाल कुबल यांनी सुवर्णपदक मिळवले. सखाराम ठाकुर, स्वरा देसाई, ऐश्वर्या परब, वेदा मराठे, सृजन प्रभूदेसाई यांनी रौप्यपदक मिळविले. तर ओम सावंत, निधीं गवस, सान्वी गवस, श्रेया गवस, व्यंजित सरदुल्ला, हर्षदा भणगे यांनी कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेचे आयोजन मनुराय नाईक यांनी केले होते. समारोपप्रसंगी दत्ता नाईक व बुधाजी हसापूरकर यांच्या हस्ते विजेत्यांना पदके व प्रशस्तीपत्र देण्यात आले. खेळाडूंना प्रशिक्षक विष्णू नाईक व प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले.
--------------------
परब यांच्याकडून
दिव्यांगांना साहित्य
वेंगुर्लेः भाजप युवा नेते विशाल परब यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना गणेश पूजन साहित्य भेट दिले. यावेळी त्यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. या उपक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्यासह प्रकाश वाघ, संजय लोनकर, समीर नाईक, अरविंद आळवे, शेखर आळवे, बाबुराव गावडे, सुधीर गवस, दिगंबर दळवी, अर्जुन राऊळ, नंदा सावंत, योगेश शिंगाडे आदींची उपस्थिती होती.
-------------------
खर्डेकर महाविद्यालयात
ध्यानचंद यांना अभिवादन
वेंगुर्लेः बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जयंतीदिन म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिमखाना प्रमुख व्ही. पी. देसाई यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, पर्यवेक्षक डी. जे. शितोळे व संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक यांनी ध्यानचंद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या प्रसंगी विद्यापीठ पदक विजेती खेळाडू गायत्री राणे हिचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन वासुदेव गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत गावडे यांनी केले.
------------------