भाईंदर, ता. ३१ (बातमीदार) : सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही भाईंदरजवळील राई आणि मोर्वा गावातील काही भक्तांनी दीड दिवसांच्या मूर्तींचे नैसर्गिक तलावात विसर्जन केले. याप्रकरणी मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी केलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी शनिवारी (ता. ३०) ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने ३५ कृत्रिम तलाव बांधले आहेत. त्यानुसार दीड दिवसाच्या मूर्तींचे विसर्जन बहुतांश ठिकाणी कृत्रिम तलावतच केले जात होते; परंतु राई आणि मोर्वा गावातील भक्तांनी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास नकार दिला. विसर्जनासाठी नैसर्गिक तलाव खुले करा, अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत होती; मात्र उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने नैसर्गिक तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार नाही, असे सांगत महापालिका कर्मचारी व पोलिसांनी तलावाचे दार उघडण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ भक्तांनी मूर्तीसह रस्त्यावरच ठाण मांडले होते.
काही जणांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून नैसर्गिक तलावाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले व मूर्तींचे त्यात विसर्जन केले. त्यानंतर शनिवारी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणे, जलप्रदूषण करणे, बेकायदा जमाव जमवणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला.