- rat३०p११.jpg-
P२५N८८१३५
पालघर : सागवेकर कुटुंबीयांनी उभारलेला संत गोरा कुंभार भक्तिमय चलचित्र देखावा.
पालघरात ‘संत गोरा कुंभार’ देखावा
सागवेकर कुटुंब; टाकाऊपासून टिकाऊचा संदेश
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३१ ः घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध पुरस्कार पटकावणारे तालुक्यातील पालघर येथील रवींद्र सागवेकर यांचा यंदाचा देखावा विशेष ठरला आहे. सागवेकर कुटुंबीयांनी संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित नामस्मरण भक्तिमय चलचित्र देखावा उभा केला असून, तो गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
सागवेकर यांच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली देखाव्याची परंपरा आज नातवंडे पुढे नेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून घरातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन हा देखावा साकारला आहे. भौतिक प्रगती साधताना भक्तीमार्ग विसरू नका, नामस्मरण करताना स्वतःलाही विसरून जा, हा संदेश यातून दिला जात आहे. या देखाव्यात संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या नामस्मरणात इतके गुंग होतात की, आपल्या लेकराकडेही त्यांचे लक्ष राहत नाही. तो मुलगा मातीत मिसळतो. पत्नीच्या शोकाकूल अवस्थेकडे पाहून पांडुरंग विठ्ठल अवतरतो आणि भक्ताच्या भक्तीचा व मातृत्वाचा गौरव करत बाळ परत देतो, हा प्रसंग प्रभावीपणे उभा करण्यात आला आहे. पुतळ्यांना दिलेली हालचाल, त्यांना मिळालेला खरा आवाज, सजावट आणि सुंदर प्रकाशयोजना हे या देखाव्याचे वैशिष्ट्य ठरत आहे. सागवेकर कुटुंबीयांनी वैयक्तिक पातळीवर हाती घेतलेला हा उपक्रम गणेशभक्तांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
-----
कोट
संत गोरा कुंभार देखाव्यात टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. यातून पर्यावरणपूरक निर्मिती साकार केली असून, देखाव्याच्या माध्यमातून भक्ती, नामस्मरण यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उभारणी करताना स्वनिर्मितीचा आनंद मिळाला असून, भाविकांच्या कौतुकाने परिश्रमाचे सार्थक झाले आहे.
- ऋणाली सागवेकर