दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय खेळाडूंमागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. शुबमन गिल याला आधी आजारामुळे या स्पर्धेतील पहिल्याच सामन्याला मुकावं लागलं. त्यानंतर तिलक वर्मा याला आशिया कप स्पर्धेमुळे दुलीप ट्रॉफीत खेळता येणार नाही. तसेच आर साई किशोर याला दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्याला मुकावं लागलं आहे. एक एक करुन अनेक खेळाडूंना दुखापत होत असताना आता त्यात आणखी भर पडली आहे. स्टार आणि अनुभवी फलंदाज सर्फराज खान यालाही दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. सर्फराजला या दुखापतीमुळे पुढील काही आठवडे खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
19 किलो वजन कमीसर्फराजची इंग्लडं दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सर्फराजने दरम्यानच्या काळात फिटनेसवर मेहनत घेतली. सर्फराजने तब्बल 19 किलो वजन कमी केलं. सर्फराजने वजन कमी करताच धमाका केला. सर्फराजने बुची बाबू स्पर्धेत शतक ठोकलं. सर्फराजने या स्पर्धेत एकूण 2 शतकं ठोकली.
सर्फराज खान याची वेस्ट झोनकडून निवडसर्फराजची बुची बाबू स्पर्धेनंतर वेस्ट झोनकडून दुलीप ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली. मात्र आता सर्फराजला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
सर्फराज खान याची कामगिरीसर्फराज खान याने बुची बाबू स्पर्धेत हरयाणा आणि तामिळनाडू क्रिकेट असोशिएशन ईलेव्हन विरुद्ध शतक केलं. सर्फराजने हरयाणा विरुद्ध 111 धावा केल्या. तर सर्फराजने तामिळनाडू क्रिकेट असोशिएशन ईलेव्हन विरुद्ध 138 धावांची झंझावाती खेळी साकारली. सर्फराजने यासह मायदेशात विंडीज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी दावा ठोकला होता. मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे सर्फराज अडचणीत सापडला आहे.
सर्फराजला दुखापतीतून पूर्णपणे फिट होण्सयासाठी 3 आठवड्यांचा वेळ लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. तसेच सर्फराज सध्या बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंस अर्थात सीओईमध्ये फिट होण्यासाठी मेहनत घेत आहे.
दरम्यान आता सर्फराज खान याच्या जागी वेस्ट झोन टीममध्ये शिवालिक शर्मा याचा समावेश केला जाऊ शकतो. शिवालिकने 18 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 43.48 च्या सरासरीने 1 हजार 87 धावा केल्या आहेत. शिवालिकने या दरम्यान 3 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत.