आपल्या भारतात विविध प्रकारचे पारंपरिक नृत्य केले जातात. यात कथक, कथकली, कुचीपूडी, आदी शास्त्रीय नृत्यांचा समावेश होतो. याच नृत्य प्रकारात मोडला जाणारा एक प्रकार म्हणजे भरतनाट्यम. हेच भरतनाट्यम करणाऱ्या एका नृत्यांगनेने विश्वविक्रम केला आहे. मंगळूर येथील या नृत्यांगनेने सलग सात दिवस म्हणजेच 170 तास भरतनाट्यम करून एक नवा विश्वविक्रम करत जगाला अचंबित केले आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी काही खास गोष्टी,
गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद –
भारतात प्रत्येक कलेला प्रोत्साहन दिले जाते आणि आपल्या देशात कलाकारांची कमी नाही. कोणी कशात विक्रम करेल हेही सांगता येणार नाही. असाच विश्वविक्रम या तरुणीने केला आहे. या तरुणीचे नाव आहे रेमोना एव्हेट परेरा असे आहे. कर्नाटकातील मंगळुरु येथील सेंट अलॉयसियस येथे कला शाखेतील अंतिम वर्षाच्या रेमोनाने सलग 170 तास भरतनाट्यम सादर करून उल्लेखनीय असा जागतिक व्रिकम केला आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिला गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.
रेमोना ठरली पहिली कलाकार –
रेमोनाने 21 जुलै ते 28 जुलै 2025 या सात दिवसात सलग 170 तास भरतनाट्यम केले आहे. 170 तास म्हणजे जवळपास 10,200 मिनिटे नृत्य केले आहे. दर तीन तासांनी फक्त 15 मिनिटांचा ब्रेक घेत तिने हा सात दिवसांचा टप्पा गाठला आहे. या काळात तिने कमीत कमी जेवण केले. रेमोना ही भारतीय शास्त्र नृत्य इतक्या तासांपर्यंत अविरत सादर करणारी पहिली कलाकार ठरली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतूक होत आहे.
वयाच्या तीन वर्षांपासून शिकतेय नृत्य –
रेमोना हीने वयाच्या तिसऱ्या वर्षी गुरु श्री विद्धा मुरलीधर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम शिकण्यास सुरूवात केली. रेमोना केवळ भरतनाट्यमच नाही तर सेमी-क्लासिकल, हिप-हॉप, लेटिन आदी नृत्यप्रकारात पारंगत आहे. 2019 मध्ये तिने एकल सादरीकरणात पदार्पण केले होते. 2022 मध्ये तिला प्रधानमंत्री बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या अद्भूत कामगिरीमुळे रेमोना वयाच्या अवघ्या 20 वर्षी जागतिक स्तरावर भारतीय शास्त्रीय नृत्याची मान उंचावणारी कलाकार ठरली आहे. एकदरंच, तिची चिकाटी आणि समर्पण नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे.
हेही पाहा –