मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आझाद मैदानात जरांगेंच्या भेटीसाठी आल्या होत्या. त्यावेळी आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घालत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या गाडीवर बाटल्याही फेकण्यात आल्या. आता या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय.
सुप्रिया सुळे आझाद मैदानात गेल्या तेव्हा जरांगे पाटील हे झोपले होते. त्यांनी तशाच स्थितीच सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची तब्येतीची विचारपूस केली आणि तिथून निघाल्या. बाहेर निघताना त्यांना आंदोलकांनी घेरलं आणि कारवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'शरद पवारांनी वाटोळं केलं', आझाद मैदानात सुप्रिया सुळेंना आंदोलकांनी घेरलं; गाडीवर पाणी बॉटल फेकल्या, VIDEO VIRALसुप्रिया सुळेंना घेरल्याच्या प्रकारावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जे घडलं ते योग्य नाहीय. कोणतेही नेते हे आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलकांना भेटण्यासाठी गेले तर त्यांना योग्य वागणूक मिळायला हवी. आंदोलकांना भेटायला आलेल्या नेत्यांना घेराव घालणं, बाटल्या फेकणं हे प्रकार करून किंवा हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाहीय.
दरम्यान, फडणवीस यांनी जरांगे पाटलांच्या मागण्यांवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, आम्ही जरांगे पाटलांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं बघतोय. एखादी मागणी मान्य करायची असेल तर ती कायद्याच्या चौकटीत बसायला हवी. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी होतेय. पण इथं सोशल फॅब्रिकचा प्रश्न आहे. कोर्टाचे काही निर्णय आहेत आणि त्याचा आपल्याला अवमान करता येणार नाही.
कायद्याच्या चौकटीत बसेल असे निर्णय घेण्यास सरकार तयार आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घ्या असं कुणी म्हटलं तरी तो निर्णय एक दिवसही टिकणार नाही. त्यानंतर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना होईल. यामुळेच मंत्रिमंडळ उपसमिती यासंदर्भात चर्चा करतेय आणि कायदेशीर सल्लागारांशीही चर्चा केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.