मोरगाव केंद्रशाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
esakal September 02, 2025 05:45 PM

swt3129.jpg
88531
मोरगावः येथे स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेले माजी विद्यार्थी.

मोरगाव केंद्रशाळेतील माजी
विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः मोरगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा क्र. १ आणि मोरगाव गावठण शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जिल्हा परिषद केंद्रशाळेत उत्साहात पार पडला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष आईर होते. उपसरपंच देविदास पिरणकर, माजी सरपंच आप्पा कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर, सेवानिवृत्त कॅप्टन वामन नाईक, नंदलाल पिरणकर, सत्यवान नाईक, प्रमोद बांदेकर, मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल आणि भिकाजी गावडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी शाळेत राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची यशोगाथा व शाळेची प्रगती याबद्दल माहिती दिली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला. जिल्हा परिषद शाळेने दिलेला भक्कम शिक्षणाचा पाया त्यांच्या जीवनप्रवासात कसा उपयोगी ठरला हे अनेकांनी अनुभवकथनातून सांगितले. भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी एकदिलाने सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सहाध्यायींनी परस्परांना भेटून आत्मीय संवाद साधला. गावातील शैक्षणिक संस्कृती व परंपरा अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय सर्वांना आला. सूत्रसंचालन मणिपाल राऊळ यांनी केले. आयोजनात उपशिक्षिका स्वाती पाटील, स्नेहलता ढेकळे, अंगणवाडी सेविका हेमा नाईक, संगीता कदम तसेच अनेक माजी विद्यार्थी यांनी मनापासून परिश्रम घेतले. या स्नेहमेळाव्यामुळे मोरगाव शाळेच्या इतिहासातील एक संस्मरणीय पान लिहिले गेले असून, शाळेचा लौकिक वृद्धिंगत करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.