भारतीय हॉकी संघाने जपानवर ३-२ असा विजय मिळवून आशियाई करंडकाच्या ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश केला.
कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
मनदीप सिंगने चौथ्या मिनिटाला फिल्ड गोल केला. जपानकडून कोसेई कवाबेने दोन गोल केले, परंतु भारतीय संघाने विजयाची बाजी मारली.
कर्णधार हरमनप्रीत सिंग याच्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानवर ३-२ असा विजय साकारला आणि आशियाई हॉकी करंडकाच्या ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश केला.
सलामीच्या लढतीत चीनविरुद्ध खेळताना गोलची हॅट्ट्रिक साजरा करणारा हरमनप्रीत सिंग याने जपानविरुद्धच्या लढतीत पाचव्या व ४६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले. मनदीप सिंग याने चौथ्या मिनिटाला फिल्ड गोल केला. जपानकडून कोसेई कवाबे याने ३८व्या व ५८व्या मिनिटाला गोल केले.
IND vs PAK, Hockey: ज्युनियर वर्ल्डकप हॉकीसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार!भारतीय हॉकी संघाने पहिल्या दोन लढतींत विजय मिळवून सहा गुणांची कमाई केली आहे. अ गटामध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. चीन व जपान या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजयासह तीन गुणांची कमाई केली आहे. चीनचा संघ दुसऱ्या व जपानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. या गटातील साखळी फेरीच्या अखेरच्या लढती १ सप्टेंबरला होणार आहेत.
सलामीच्या चीनविरुद्धच्या लढतीत भारतीय हॉकी संघाचा बचाव कमकुवत दिसला. जपानविरुद्धच्या लढतीत भारतीय हॉकी संघाच्या खेळामध्ये सुधारणा दिसून आली. वेगवान हॉकीमुळे भारतीय हॉकी संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टजवळ अधिक वेळा पोहोचता आले.
चौथ्या मिनिटालाच भारतीय हॉकी संघाने गोलचे खाते उघडले. हमनरप्रीत सिंग, जरमनप्रीत सिंग यांच्या अफलातून खेळाच्या जोरावर भारतीय हॉकी संघाला पहिल्या गोलची पायाभरणी करता आली. त्यानंतर सुखजीत सिंगने मनदीप सिंगकडे चेंडू सोपवला. मनदीप सिंगने जपानचे दोन बचावपटू व गोलरक्षकाला भेदत भारताला पहिला गोल करून दिला.
भारतीय हॉकी संघाला पाचव्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. हरमनप्रीत सिंग याने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताची आघाडी वाढवली. भारतीय हॉकी संघ २-०ने पुढे गेला. पहिल्या सत्रात भारतीय हॉकी संघाकडे ही आघाडी कायम राहिली.
मात्र पहिल्या सत्राच्या अखेरच्या क्षणांमध्ये जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण भारताचा गोलरक्षक क्रिशन बहादूर पाठक याने जपानचे आव्हान लीलया परतवून लावले. दुसऱ्या सत्रात जपानच्या संघाला सलग चार पेनल्टी कॉर्नर मिळूनही जपानला गोल करता आला नाही. भारतीय हॉकी संघालाही या सत्रात गोल करण्याची संधी होती; पण त्यांनाही गोल करता आला नाही.
जपानकडून तिसऱ्या सत्रात पहिला गोल करण्यात आला. कोसेई कवाबे याने ३८व्या मिनिटाला हा गोल केला. कैतो तनाका याच्याकडून आलेल्या पासवर त्याने हा गोल केला हे विशेष; मात्र हरमनप्रीत सिंग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला ४६व्या मिनिटाला तिसरा गोल करून दिला व जपानवरील आघाडी ३-१ अशी वाढवली. सामना संपायला अखेरची दोन मिनिटे बाकी असताना कोसेई कवाबे याने जपानला दुसरा गोल करून दिला, तोपर्यंत मात्र उशीर झाला होता.
चीनचा महाविजयसलामीच्या लढतीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर चीनच्या संघाने रविवारच्या लढतीत झोकात पुनरागमन केले. चीनच्या हॉकी संघाने कझाकस्तानचा १३-१ असा धुव्वा उडवत आशियाई करंडकातील ‘सुपर फोर’ फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवले. लू युवानलिन याने चीनकडून गोलची हॅट्ट्रिक साजरी केली.
Asian Hockey Championship: चीनने यजमान भारतीय संघाला झुंजवले; आशियाई हॉकी करंडक, हरमनप्रीत सिंगची हॅट्ट्रिक, ४-३ने विजय दुसरा संघ कोणता?आशियाई करंडकातील अ व ब अशा दोन्ही गटांतील दुसऱ्या क्रमांकाचा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. अ गटातून भारताने दोन विजयांसह आणि ब गटातून मलेशियाने दोन विजयांसह ‘सुपर फोर’ फेरीत धडक मारली आहे; मात्र दोन्ही गटांतून दुसऱ्या क्रमांकाचा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. दोन्ही गटांतील अखेरच्या साखळी फेरीच्या लढती उद्या होणार आहेत.
अ गटामध्ये भारत-कझाकस्तान, चीन-जपान यांच्यामध्ये लढती पार पडतील. ब गटामध्ये बांगलादेश-दक्षिण कोरिया, मलेशिया-चीन तैपई यांच्यामध्ये लढती पार पडतील. अ गटामधून चीन व जपान यांना, तर ब गटामधून दक्षिण कोरिया व बांगलादेश यांना पुढल्या फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे.