Thane News: दीड वर्षानंतर कोपरीकरांसाठी पायवाट मोकळी, भाजप माजी नगरसेवकाच्या प्रयत्नांना यश
esakal September 02, 2025 05:45 PM

ठाणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) इमारतीच्या बांधकामामुळे साठ वर्षांपूर्वीची पायवाट कोपरीकरांसाठी बंद झाली होती. गेल्या दीड वर्षापासून गायब झालेली ही पायवाट अखेर भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे खुली झाली आहे. कोपरीतील धोबी घाट येथील श्रमसाफल्य सोसायटीजवळचा रस्ता दीड वर्षापूर्वी एसआरए इमारतीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता.

या कामासाठी सहा महिन्यांची मुदत विकसकाने दिली होती. प्रत्यक्षात संथ गतीने एसआरए प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे ग्रामस्थांची पायवाट बंद झाली होती. त्यामुळे त्यांना वळसा घालून जावे लागत होते. शांतीनगर, आनंदनगर, सिद्धार्थनगर, धोबी घाट परिसरातील हजारो नागरिकांना त्याचा फटका बसत होता. विशेषत: याच पायवाटेवरून नागरिकांचा शाळा, बाजारपेठ, मंदिर आणि शेठ लखमीचंद फतीचंद हॉस्पिटलकडे जाण्याचा रस्ता होता.

Mumbai Ganeshotsav News : मुंबईत पाचव्या दिवशी ३६ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

ही पायवाट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी महिलांनी दिवसभर धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रश्नावर भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून प्रशासनाबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यात आला.

दुसरी पायवाट खुली

कोपरी गावातून बाजारपेठेत येण्यासाठी नागरिकांची वर्षानुवर्षे असलेली पायवाट पुन्हा खुली करण्यात आली. यापूर्वी २०२२मध्ये कोपरीतील आदित्य प्लाझा सोसायटीलगतची पायवाट बंद झाली होती. दरम्यान, यावर चर्चा करून ही पायवाट खुली झाली होती.

Maratha Reservation: मुंबईत मराठा कार्यकर्त्यांचा ओघ सुरुच; ऐरोलीत पोलिसांचा फौजफाटा तैनात
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.