पिंपरी, ता. २ : शहरातील वल्लभनगर एसटी बसस्थानक हे प्रवाशांसाठी सोयी-सुविधांचा अभाव आणि अस्वच्छतेचे केंद्र बनले आहे. बसस्थानकात प्रवाशांना पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध नाही. उपहारगृहाची अवस्था बिकट असून दर्जेदार खाद्यपदार्थांचा मोठा अभाव जाणवतो. स्थानकातील स्वच्छतागृहे सदैव अस्वच्छ असतात. दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. भिंतींवर सर्वत्र थुंकलेले आढळते. सीसीटीव्ही अपुरे प्रवासी सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
वल्लभनगर एसटी आगार परिसरतील महामेट्रोच्या दुचाकी पार्किंगमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती झाली आहे. तसेच कचरा साचल्याने आजार पसरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आगार परिसरात रस्त्यांच्या कामामुळे धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. सध्या वल्लभनगर एसटी आगारात ५५ बस असतात. दिवसभरात ३१ जाणाऱ्या आणि ३१ येणाऱ्या फेऱ्या सुरू असतात. विविध आगारांमधील सुमारे साडेपाचशे बस दररोज या स्थानकात दाखल होतात. मात्र, जुन्या बसमुळे ताफा खिळखिळा झाल्याची स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था, सुसज्ज कँटीन, स्वच्छतागृहांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वल्लभनगर परिसरात अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ दिसून आली. दैनंदिन स्वच्छता ठेवल्यास प्रवाशांना चांगले वातावरण मिळेल.
- बाळासाहेब जाधव, प्रवासी.