मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चिचुंद्री म्हणून उल्लेख, आता नितेश राणे प्रतिक्रिया देत म्हणाले…
Tv9 Marathi September 04, 2025 05:45 AM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू होते. जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी पाचव्या दिवशी हे उपोषण सोडले. यादरम्यान मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी बघायला मिळाली. कोर्टाने थेट हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे म्हटले. यादरम्यानच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मंत्री नितेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. जरांगे यांनी थेट नितेश राणे यांना चिंचुद्रीच म्हटले होते. यानंतर राणे नेमके काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना दिसले. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठी टीका केल्याने नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना खडेबोल सुनावले होते. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे यांनी नितेश राणे यांना थेट चिंचुद्री म्हटले होते. फक्त हेच नाही तर एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच असे जरांगे यांनी म्हटले.

नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन संपल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,  हैदराबाद गॅझेट प्रमाणे निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. आतापर्यंत जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्येच आता मराठा समाजाने याची दखल घेतली पाहिजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, असे नितेश राणेंनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानताना मंत्री नितेश राणे हे दिसले. मात्र, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी चिंचुद्री म्हटलेल्या विधानावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांना नितेश राणे नेमकं काय उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, त्यांनी भाष्य करणे टाळले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.