रात्री लहान मुलांचे पाय दुखतात? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय
Marathi September 04, 2025 09:25 PM

लहान मुलं दिवसभर खेळ, पळापळ आणि धिंगाण्यात इतकी रमून जातात की त्यांना स्वतःच्या शरीराचा थकवा कळत नाही. पण रात्री जेव्हा ते अंथरुणावर पडतात, तेव्हा त्यांना सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे पाय दुखणे. अनेक पालकांना अशी तक्रार नेहमीच मुलांकडून ऐकायला मिळते. काही वेळा मुलांचे पाय इतके दुखतात की आई-वडिलांना त्यांना झोपवण्यासाठी पाय दाबून द्यावे लागतात. (children leg pain causes remedies)

बर्‍याच जणांना वाटतं की हे दुखणं फक्त दिवसभर पळाल्यामुळे आहे, पण खरेतर त्यामागे इतरही कारणं असू शकतात. चला तर पाहूया लहान मुलांच्या पायदुखीची कारणं आणि त्यावर घरच्या घरी करता येणारे उपाय.

मुलांचे पाय दुखण्यामागची प्रमुख कारणं

1.जास्त शारीरिक हालचाल: दिवसभर पळापळ आणि खेळामुळे स्नायूंना थकवा येतो आणि पाय दुखू लागतात.

2.डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता): मुलं पाण्यापेक्षा कोरडं अन्न जास्त खातात. खेळताना पाणी प्यायला विसरतात. त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना निर्माण होतात.

3.संतुलित आहाराचा अभाव: भाज्या, फळं आणि पौष्टिक आहार कमी मिळाल्यास शरीरात उर्जेची कमतरता भासते आणि पाय दुखू शकतात.

4.हाडांची वाढ: मुलांच्या वयात हाडं झपाट्याने वाढतात. हाडं वाढल्यावर आजूबाजूचे स्नायू ताणले जातात. त्यामुळेही पायदुखी जाणवते.

5.कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता: हाडं आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेली ही पोषक तत्त्वं कमी मिळाल्यास मुलांना पायदुखी होऊ शकते.

मुलांच्या पायदुखीवर सोपे उपाय

– मुलांना दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा.

– संतुलित आहार द्या, ज्यात दूध, फळं, भाज्या आणि सुका मेवा यांचा समावेश असेल.

– झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने मुलांच्या पायांची सौम्य मालिश करा.

– गरम पाण्याची पिशवी घेऊन पाय हलकेच शेकून द्या.

– साधे स्ट्रेचिंग आणि मुलांसाठी सोपे योगासने करून घ्या.

लहान मुलांची पायदुखी ही तात्पुरती असू शकते, पण ती वारंवार होत असेल तर पालकांनी दुर्लक्ष करू नये. आहार, पाण्याचं प्रमाण आणि जीवनसत्त्वांची कमतरता दूर केल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. योग्य काळजी घेतली तर मुलांना रात्री शांत झोप लागेल आणि पायदुखीची तक्रारही थांबेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.