तुम्ही कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. हो. GST कौन्सिलने कर कमी केला आहे. याचा फायदा ग्राहक आणि कंपन्या दोघांनाही आता होणार आहे. GST चे नवे नियम हे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याचा परिणाम लक्झरी कारवरील कर हा 45 ते 50 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आणला जाणार आहे. या कर कपातीमुळे लक्झरी कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
आता मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, जग्वार लँड रोव्हर (JLR) आणि ऑडी सारखे लक्झरी ब्रँड भारतात थोडे स्वस्त होऊ शकतात. कारण वस्तू व सेवा कर (GST) परिषदेने कर कमी केला आहे आणि नुकसान भरपाई उपकरही काढून टाकला आहे. याचा थेट फायदा कार कंपन्या आणि ग्राहकांना होणार आहे.
GST कमी झाल्याने लक्झरी कारच्या किमती कमी होतील, त्यामुळे लोकांना स्वस्त दरात लक्झरी कार खरेदी करता येतील आणि मागणी वाढल्याने कंपन्यांनाही फायदा होईल.
GST मध्ये काय बदल झाला?
GST आता 5 टक्के आणि 18 टक्के अशा दोन स्लॅबमध्ये ठेवण्यात आला आहे. यापूर्वीचे 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय लक्झरीसाठी नवीन 40 टक्के स्लॅब सादर करण्यात आला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या सर्व गाड्यांवर 28 टक्के GST आकारला जात होता. याशिवाय मॉडेल आणि इंजिनच्या आकारानुसार 1 टक्के ते 22 टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई उपकर देखील आकारला जात होता. लक्झरी कारवरील सेस 17 ते 22 टक्क्यांपर्यंत होता, त्यामुळे एकूण कर 45 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत कोणत्याही वाहनाच्या एक्स-शोरूम किमतीत GST आणि नुकसान भरपाई उपकर या दोन्हींचा समावेश होता.
किंमती का घसरणार?
भारतातील लक्झरी कारवर जगातील इतर देशांच्या तुलनेत नेहमीच जास्त कर लावला जातो, ज्यामुळे त्या खूप महाग असतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरपासून ही नवी करप्रणाली लागू होणार आहे. GST कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, लक्झरी कार आता नवीन 40 टक्के स्लॅबमध्ये येतील. GST च्या नव्या नियमानुसार, कोणत्याही गोष्टीवर जास्तीत जास्त 40 टक्के कर आकारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्झरी कारवरील एकूण कर 45-50 टक्क्यांऐवजी 40 टक्के असेल. 5 ते 10 टक्के कर कमी केल्याने भारतातील लक्झरी कारच्या किमती कमी होतील आणि मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी सारख्या सर्व ब्रँड्सना याचा फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लक्झरी कारची मागणी वाढणार?
काही लक्झरी कार डीलर्सचे मत आहे की कमी करामुळे वाहनांची मागणी वाढेल आणि लक्झरी सेगमेंटमध्ये प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांचा रस वाढेल. भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी कार बाजारपेठ असली तरी लक्झरी वाहनांचा वाटा केवळ 1 टक्के आहे. लक्झरी कार ब्रँडच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, भारताच्या एकूण कार विक्रीत लक्झरी वाहनांचा वाटा किमान 3 टक्के असावा. आणखी एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, नवीन GST दरांमुळे लक्झरी वाहनांचा वाटा वाढू शकतो, ज्यामुळे खरेदीदार आणि कंपन्या दोघांसाठीही ही बाजारपेठ अधिक आकर्षक होऊ शकते.