म्हातारपण सुखकर करणारी अटल पेन्शन योजना काय आहे? ती NPS पेक्षा वेगळी कशी?
BBC Marathi September 06, 2025 10:45 AM
Getty Images अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून कोणत्याही व्यक्तीला निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन मिळवता येते.

आपल्याला सरकारी नोकरी नाही आणि जास्त पैसे मिळतील अशी खासगी नोकरीही नाही, मग आपलं म्हातारपण कसं जाईल? असे प्रश्न तुम्हाला सतत पडत असतील तर भारत सरकारची अशी एक योजना आहे, जी तुमचं म्हातारपण सुखकर करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

भारत सरकारनं समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या उतारवयात आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी अटल पेन्शन योजना म्हणजेच एपीवाय सुरू केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू झाली आहे.

म्हातारपणी कष्ट करून कमावण्याची ताकद कमी झालेली असते, वय वाढलेलं असतं. वयानुसार आरोग्यविषयी तक्रारी सुरू झालेल्या असतात, अशावेळी आर्थिक चणचण भासू नये हा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली.

नंतरच्या काळात योजनेत काही बदल करण्यात आले. ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालवली जाते.

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते, या उद्देशानंच ती सुरू करण्यात आली आहे.

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून कोणत्याही व्यक्तीला निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन मिळवता येते.

या योजनेचं सर्वांत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पेन्शन मिळणाऱ्या म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, तरी त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना याचा फायदा मिळण्याची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.

आपण केलेल्या गुंतवणुकीसोबत या योजनेत सरकार देखील योगदान देतं. त्यामुळे ही योजना फायदेशीर ठरते.

मात्र या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची, त्याचे नियम काय आहेत आणि ही योजना राष्ट्रीय पेन्शन योजनोपेक्षा वेगळी कशी ठरते? याचीच माहिती या लेखातून घेणार आहोत.

अटल पेन्शन योजनेचा नेमका फायदा काय?

या योजनेत कोणत्याही व्यक्तीला 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत ठराविक रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळू शकते.

वयाच्या 60 व्या वर्षांपासून ही पेन्शन मिळायला सुरू होते. परंतु, योजनेतील पेन्शनची रक्कम आपण केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते.

जर तुम्हाला 1,000 रुपये मासिक पेन्शन हवी असेल आणि वयाच्या 18 व्या वर्षापासून तुम्ही त्यासाठी गुंतवणूक सुरू केली असेल, तर तुम्हाला दरमहा फक्त 42 रुपये गुंतवणूक करावी लागेल.

जर 18 व्या वर्षापासून दरमहा 210 रुपये गुंतवणूक केली, तर वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा 5000 रुपये मिळू शकतात.

म्हणजेच तुम्हाला पेन्शनमध्ये दरमहा किती रूपये मिळणार हे तुम्ही या योजनेत किती पैसे गुंतवले आहेत यावर अवलंबून असते.

अटल पेन्शन योजनेच्या अटी काय?

या योजनेचा लाभ घेण्यास पात्र व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी.

60 वय पूर्ण होईपर्यंत त्यांनी या योजनेत पैसे भरणं आवश्यक आहे. शिवाय या योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षं गुंतवणूक करणं आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्तीचं अकाली निधन झालं तर ही अट लागू होत नाही.

अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीचं बँक खातं किंवा पोस्ट ऑफिस बचत खातं असणं अनिवार्य आहे. शिवाय ते बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं गरजेचं आहे.

जी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे, आयकर देणारी आहे किंवा पूर्वीपासूनच ईपीएफ, ईपीएस सारख्या योजनेचा फायदा घेत आहे, तिला या योजनेचा लाभ घेता येत नाही.

Getty Images 60 वय पूर्ण होईपर्यंत तुम्हाला या योजनेत पैसे भरणं आवश्यक आहे.

या योजनेत आपणास दरमहा, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने गुंतवणुकीची रक्कम जमा करता येते.

अटल पेन्शन योजनेच्या बाबतीत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध नाही. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला किंवा त्याला गंभीर आजार झाला, तरच मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी मिळू शकते.

गुंतवणूकदाराला एका वेळी एकच खातं उघडता येतं. एकापेक्षा अधिक खाती उघडता येत नाहीत. तसेच अल्पवयीन व्यक्तीला या योजनेसाठी खातं उघडता येत नाही. शिवाय वयाच्या 40 व्या वर्षानंतर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही.

या योजनेत गुंतवणूक केलेल्या व्यक्तीनं भारतीय नागरिकत्व सोडलं, तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांनी गुंतवलेले पैसे परत केले जातात, पण सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाचा फायदा त्यांना मिळत नाही.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या इथे जाऊन पाहू शकता.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता.

ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची पद्धत -

ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेत तुमचं बचत खातं आहे त्या बँकेत जावं लागतं. देशातील बहुतेक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका या योजनेची नोंदणी करून घेतात.

संबंधित बँकेकडून नोंदणी फॉर्म येतो किंवा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो. फॉर्ममध्ये तुमचे सर्व तपशील अचूक भरावे लागतात आणि पेन्शन रकमेचा पर्याय निवडावा लागतो. इतर कागदपत्रांसह हा फॉर्म जमा करावा लागतो.

यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येतो. त्यात तुमचा युनिक अटल पेन्शन योजनेचा अकाउंट नंबर असतो.

Getty Images या योजनेत कोणत्याही व्यक्तीला 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत ठराविक रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळू शकते.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत -

बँक पोर्टल किंवा मोबाइल बँकिंग अॅपवर जावं लागतं.

त्यानंतर, ज्या विभागात योजनेत नाव नोंदणी करण्याची सुविधा दिलेली आहे, तिथे जाऊन आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो.

'सोशल सिक्युरिटी स्कीम' सेक्शन किंवा थेट अॅपवर 'अटल पेन्शन स्कीम' देखील सर्च करता येतं.

यानंतर अर्ज भरून आपली सर्व माहिती द्यावी लागते.

तुम्हाला मासिक अंशदान रकमेच्या ऑटो-डेबिटसाठी संमती देता येते.

सर्व तपशिलांचा आढावा घेतल्यानंतर फॉर्म जमा करावा लागतो.

जर तुम्हाला या योजनेतून बाहेर पडायचं असेल, तर बाहेर पडता येतं. त्यासाठी संबंधित बँकेत जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागतो.

नोंदणीसाठी या संकेतस्थळालातुम्ही भेट देऊ शकता.

गरजेची कागदपत्रं कोणती?

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रं गरजेची असतात.

  • घराच्या पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्टच्या आकाराचा फोटो
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ओळखपत्र
  • पॅनकार्ड
  • बँक पासबुक
  • नॉमिनीचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
काही अडचण आल्यास तक्रार कशी करायची?

अटल पेन्शन योजनेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही हेल्प डेस्कवरील (टोल फ्री) 1800 889 1030 या क्रमांकावर कॉल करू शकता.

तसेच अटल पेन्शन योजनेच्या चॅट बॉटवरही तुम्ही मदत मागू शकता. याशिवाय या योजनेचं खातं असलेल्या संबंधित बँकेच्या शाखेत जाऊनही तुम्ही तुम्हाला हवी ती माहिती विचारू शकता आणि तक्रारही करू शकता.

या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन माहिती घेऊ शकता आणि तक्रार देऊ शकता.

तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी उपस्थित केलेल्या तक्रारींसाठी टोकन नंबर देण्यात येतो.

"एनक्वायरी ऑलरेडी रजिस्टर्ड /चेक द स्टेट्स ऑफ ग्रीवियन्स" या अंतर्गत तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती वेळोवेळी तपासू शकतो.

Getty Images अटल पेन्शन योजना एनपीएस आणि एपीवाय या दोन पेन्शन योजनांमध्ये काय फरक आहे?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2004 मध्येराष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) सुरू करण्यात आली. 2009 मध्ये ही योजना सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी खुली करण्यात आली. यामध्ये कोणतीही व्यक्ती नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवू शकते.

अटल पेन्शन योजना म्हणजेच एपीवाय ही भारत सरकारनं हमी दिलेली पेन्शन योजना आहे. ही योजना पीएफआरडीएद्वारे चालविली जाते. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे.

या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावं लागतं. या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी 20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. मात्र, नॅशनल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचं वय 18 ते 55 वर्ष इतकं असावं लागतं.

भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती तसेच अनिवासी भारतीयही एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र अटल पेन्शन योजनेत केवळ भारतातील रहिवासीच गुंतवणूक करू शकतात.

Getty Images सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) सुरू करण्यात आली. 2009 मध्ये ते सर्व प्रकारच्या लोकांसाठी खुली करण्यात आली.

एनपीएस निवृत्तीनंतर पेन्शनची हमी देत नाही. खरं तर एनपीएस भांडवली बाजाराशी निगडित आहे. त्यामुळे नफ्याची शाश्वती नसते. त्याचबरोबर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन मिळते.

एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती असतात, टियर 1 आणि टियर 2.

टियर 1 मधून वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत निधी काढता येत नाही. टियर 2 एनपीएस खातं बचत खात्यासारखं काम करतं, तुम्ही आपल्या गरजेनुसार त्यातून पैसे काढू शकता.

तर अटल पेन्शन योजनेत एकाच प्रकारचं खातं असतं आणि यात तुम्ही अकाली मृत्यू किंवा गंभीर आजाराशिवाय मॅच्युरिटीपूर्वी गुंतवलेले पैसे काढू शकत नाही.

नॅशनल पेन्शन योजनेसंदर्भातील अधिक माहिती तुम्ही इथे वाचू शकता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • NPS : म्हातारपणात आर्थिक सुरक्षेसाठी असलेली नॅशनल पेन्शन सिस्टम काय आहे, महिन्याला किती रुपये मिळू शकतात?
  • भारतात म्हातारपण घालवणं किती कठीण? आधीपासून कशा प्रकारची तयारी करायला हवी?
  • ETF म्हणजे काय ? यात कसे पैसे गुंतवू शकता, शेअर्स आणि ETF मध्ये काय फरक आहे?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.