अहिल्यानगर: रेल्वेमध्ये मुलीला क्लर्कची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत नगरमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १८ लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सहा जणांच्या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय केळगंद्रे पशुसंवर्धन विभागात नोकरीला होते. ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांची अनिल भास्कर पडघलमल (रा. डॉ. वने हॉस्पिटलजवळ, राहुरी) याच्याशी ओळख होती. त्याने त्यांच्या मुलीला रेल्वे खात्यात क्लर्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्यांची ओळख संतोष चंद्रकांत कटारे (रा. मुरबाड रोड, कल्याण, ठाणे) व सुकुमार पवार (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) यांच्याशी करून दिली.
मुलीला नोकरी लावण्यासाठी या तिघांनी आणि त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी केळगंद्रे यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून १७ ते २९ ऑगस्ट दरम्यान नगरमधील वाडिया पार्क, मुंबईमध्ये व्ही. टी. स्टेशन परिसरातील हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे क्लर्कचे (वर्ग ३) नियुक्तीपत्र दिले. ते नियुक्तीपत्र घेऊन कामावर हजर होण्यासाठी घेऊन गेले असता, ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे समजले.