प्रसिद्ध ब्रिटिश शेफ गॉर्डन रॅमसे यांनी त्वचेच्या कर्करोगाचे उपचार घेतले असल्याची माहिती अलिकडेच जाहीर केली. डॉक्टरांच्या उपचारांनी त्यांनी बेसल सेल कार्सिनोमा (मेलेनोमा नसलेला कर्करोगाचा एक प्रकार) नावाच्या कॅन्सरमधून ते मुक्त झाले.
यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले.
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट कर्णधार मायकल क्लार्कनंही त्वचेच्या कर्करोगासाठी कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
त्वचेच्या कर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी तो प्रयत्नही करत आहे.
त्वचेच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका अंदाजानुसार, जगभरात दरवर्षी त्वचेच्या कर्करोगाचे 15 लाख नवे रुग्ण आढळतात.
2040 पर्यंत हा आकडा आणखी 50 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
या रिपोर्टमध्ये आपण त्वचेचा कर्करोग कसा ओळखावा आणि त्याचा सर्वाधिक धोका कुणाला असू शकतो, हे पाहूयात.
त्वचेच्या कर्करोगाची मुख्य कारणे कोणती आहेत?जगभरात त्वचेच्या कर्करोगाचं मुख्य कारण हे सूर्याची अतिनील किरणं आहेत. ही किरणं कार्सिनोजेनिक म्हणजेच कर्करोगजन्य असतात. म्हणजेच त्यात कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक असतात.
दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मधील त्वचारोगतज्ज्ञ प्राध्यापक सोमेश गुप्ता यांच्या मते, "जे लोक उन्हात काम करतात त्यांना त्वचेच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. अनेक वर्षे दररोज जर शरीर जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहत असेल अशा काही लोकांना याचा धोका असू शकतो."
त्यामुळं उन्हात, शेतात, मोकळ्या मैदानात आणि इतर अशी कामं करणाऱ्या लोकांना याचा जास्त धोका असतो.
डॉ. सोमेश म्हणतात की, "गोऱ्या लोकांमध्ये याचा धोका जास्त असतो. कारण काळी त्वचा पृष्ठभागावरील बहुतांश सूर्यप्रकाश शोषून घेते. त्यामुळं सूर्यप्रकाश आत पोहोचत नाही. त्यामुळं उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातील लोकांना कमी धोका असतो. कारण उत्तर भारतातील लोकांच्या तुलनेत त्यांची त्वचा अधिक गडद रंगाची असते."
आपल्या त्वचेला मर्यादित प्रमाणात अल्ट्राव्हायलेट किरणं मिळाली तर त्याच्या पेशी व्हिटॅमिन डी तयार करतात. जास्त उन्हात राहिल्यानं त्वचा मेलानिन तयार करते. या प्रक्रियेत त्वचा स्वतःला टॅन करत म्हणजे त्वचेचा रंग अधिक गडद बनवत स्वतःचं संरक्षण करते.
क्रिकेटपटू मायकल क्लार्कच्या बाबतीतही ते स्पष्टपणे दिसतं. तो बराच काळ घराबाहेर खेळला आहे आणि त्याचा रंगही गोरा आहे.
तसंच ऑस्ट्रेलिया अशा देशांपैकी एक आहे ज्यांच्या भागातील आकाशात ओझोनच्या थराचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे.
ओझोन थराचं नुकसान झाल्यानं सूर्यकिरणांबरोबर येणारी अल्ट्राव्हायलेट (UV) किरणं फिल्टर होऊ शकत नाहीत. त्यामुळं त्वचेला जास्त प्रमाणात नुकसान होतं.
तसंच ज्यांची त्वचा अधिक संवेदनशील असते त्यांना काचेच्या खिडक्यांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळं नुकसान होण्याचा धोका असतो.
त्वचेच्या कर्करोगाची लक्षणं कोणती?त्वचेच्या कर्करोगाची लक्षणं ओळखणं सोपे नाही. तसंच या आजारानं ग्रस्त असलेले बरेच लोक सुरुवातीला लक्षणांबद्दल निष्काळजी दिसतात, असंही म्हणता येईल.
शरीराच्या जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणाऱ्या एखाद्या भागावर (जसे की चेहरा) पुरळ, जखम किंवा व्रण दिसले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एम्सच्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. कौशल वर्मा यांच्या मते, "उंच ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये, म्हणजेच पर्वतांवर राहणाऱ्या लोकांमध्ये या आजाराचा धोका जास्त असतो. त्याचं कारण म्हणजे ते जास्त प्रमाणात अतिनील किरणांच्या संपर्कात येतात. एकेकाळी, काश्मीरमधील लोकांनाही तिथं वापरल्या जाणाऱ्या कांगडीमुळं हा आजार होण्याचं प्रमाण अधिक होतं."
म्हणजेच फक्त सूर्यप्रकाशच नाही, तर सतत उष्णतेच्या (अग्निच्या) संपर्कात राहणाऱ्यांनाही इतरांच्या तुलनेत त्वचेच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.
एम्समध्येही असं दिसून येतं कीस त्वचेच्या कर्करोगाचे रुग्ण आजार गंभीर टप्प्यात पोहोचल्यानंतर उपचारासाठी येतात. त्याचं कारण म्हणजे, सुरुवातीच्या टप्प्यात लोक त्याच्या लक्षणांकडं दुर्लक्ष करतात.
"त्वचेवर काळे किंवा तपकिरी डाग दिसू लागले तर त्वरित त्याची तपासणी करावी", असं डॉ.कौशल वर्मा म्हणतात.
अशा रुग्णांमध्ये अनेकदा त्वचेचा कर्करोग पसरतो आणि त्यामुळं नाकाचं पूर्णपणे नुकसान होतं किंवा तो डोळ्यांत पोहोचतो.
त्वचेचा कर्करोग किती धोकादायक?डॉ. कौशल वर्मा सांगतात की, "इतर कर्करोगाच्या आजारांप्रमाणे, त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले तर तोही प्राणघातक ठरतो. रुग्ण लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचला आणि सुरुवातीच्या टप्प्यांत उपचार सुरू झाले तर रुग्णाला वाचवणे सोपे ठरते."
त्वचेच्या कर्करोगाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मेलेनोमा. या प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण क्वचितच आढळतात. भारतातही हा प्रकार खूपच दुर्मिळ आहे. म्हणजेच, भारतातील लोकांमध्ये या प्रकारचा कर्करोग सहसा आढळत नाही.
हा प्रकार प्राणघातक आहे. साधारणपणे, सुरुवातीच्या टप्प्यातील मेलेनोमा कर्करोगाने ग्रस्त असलेले 90% रुग्ण बरे होतात.
पण रुग्ण रोगाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले तर त्यापैकी 90% रुग्णांना वाचवणं कठीण होतं.
डॉ. सोमेश यांच्या मते, "याशिवाय, नॉन-मेलेनोमाही आहे. यापैकी एक म्हणजे बेसल सेल कार्सिनोमा. तो लवकर पसरत नाही. तर दुसरा म्हणजे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. हा जास्त पसरतो जास्त धोकादायक असतो."
त्वचेच्या कर्करोगावरील उपचारनोएडाच्या कैलाश हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार आणि त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. अंजू झा म्हणतात की, "त्वचा कर्करोगाच्या बाबतीत भारताचा समावेश टाईप 5 आणि टाईप 6 मध्ये आहे. तो कमी धोकादायक आहे, तर गोरी त्वचा असलेले लोक टाईप 1 आणि 2 मध्ये असतात."
त्यांच्या मते, "साधारणपणे त्वचेच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना, जळजळ किंवा खाज नसते, म्हणून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणाऱ्या शरीराच्या कोणत्याही भागावर आलेला अल्सर (जखम)बराच काळ बरा होत नसेल, तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."
रुग्णाच्या त्वचेवरील लक्षणं ही प्रत्यक्षात 'कर्करोगाची' सुरुवात आहे हे सुरुवातीलाच कळलं तर उपचार करणं अधिक सोपं ठरतं. त्वचेच्या कर्करोगासाठी मोह्स (MOHS) शस्त्रक्रियाही केली जाते.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणं हा एक उत्तम मार्ग आहे असं समजलं जातं.
जगभरातील मेलेनोमा या त्वचा कर्करोगाच्या प्रकरणांतील 80 टक्के प्रकरणांसाठी सनबर्न म्हणजे उन्हाने त्वचा भाजने हे कारण असतं.
डॉ. अंजू झा यांच्या मते, "बहुतांश प्रकरणांमध्ये त्वचेचा कर्करोग घातक नसतो. प्रभावित भाग शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनद्वारे काढून टाकला जातो, पण तो टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सनस्क्रीन वापरणे."
सनस्क्रीन केवळ सूर्याच्या अतिनील किरणांपासून शरीराचे रक्षण करू शकतं एवढंच नाही. तर त्यामुळं होणारे आजार दूर ठेवत त्वचेवरील वृद्धत्वाच्या खुणा (एजिंग) कमी करण्याचं कामही करू शकतं.
परंतु सनस्क्रीन कसे आणि केव्हा लावावे याबद्दल सामान्य लोकांमध्ये योग्य आणि अचूक माहितीचा अभाव आहे.
डॉ. सोमेश सांगतात की, "घराबाहेर पडण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटं आधी सनस्क्रीन लावावं. कारण ते लगेच काम करत नाही. तसंच, दिवसातून किमान 2 किंवा 3 वेळा ते वापरणे आवश्यक आहे कारण त्याचा परिणाम फक्त 4 तास राहतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)