पती-पत्नीच्या वादाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशातच आता उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीला जुगार खेळण्याची सवय होती, जुगाराच्या नादात त्याने आपले घरदार सर्वस्व उद्ध्वस्त केले आहे. नेपाळच्या कॅसिनोमध्ये पैसे हरणाऱ्या या व्सक्तीने पैशांसाठी आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या जुगारी पतीने सासरच्या लोकांकडून पैसे आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला, तसेच तिला बेदम मारहाण केली. या व्यक्तीने काचेच्या तुकड्याने पत्नीचा गळा कापण्याचा प्रयत्न करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी तिला वाचवले. आता पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार नगर कोतवालीच्या बशीरगंज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न याच भागातील एका मुलीसोबत झाले होते. दोघांचा संसार चांगला चालला होता. मात्र हा तरुण एकदा सीमेपलीकडील नेपाळगंजच्या कॅसिनोमध्ये गेला. तिथे तो जुगार खेळू लागला. या व्यक्तीला जुगाराचे वाईट व्यसन लागले. यामुळे त्याच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला. तसेच हळूहळू आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यानंतर घरातही वाद सुरु झाले.
जुगार खेळण्यासाठी सासरकडून पैसे घेऊन ये असा हट्ट त्याने पत्नीकडे केला. त्याने तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र यासाठी नकार दिल्यामुळे त्याने पत्नीला अनेकदा बेदम मारहाण केली. तो दररोज पत्नीला त्रास देऊ लागला. त्याने 1 ऑगस्टच्या रात्री पत्नीचे कपडे काढून तिला निर्दयीपणे मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच काचेच्या तुकड्याने तिचा गळा चिरण्याचाही प्रयत्न केला.
हा सर्व प्रकार पाहून महिलेने आरडाओरडा केला, त्यामुळे शेजारच्या लोकांनी तिचा जीव वाचवला. यानंतर पीडित महिला तिच्या पालकांच्या घरी आली. त्यानंतर आता महिलेने पतीविरुद्ध मारहाण करणे, अपमान करणे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे.