Sinnar Library Elections : सिन्नर वाचनालयाच्या निवडणुकीत 'प्रगती' पॅनलचा दणदणीत विजय; सर्व ११ जागांवर वर्चस्व
esakal September 08, 2025 06:45 PM

सिन्नर: सिन्नर वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलने वाचनालयावर वर्चस्व कायम राखले. परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करीत सर्व ११ जागांवर ‘प्रगती’चे उमेदवार निवडून आले आहेत. निकालानंतर समर्थकांनी विजयी जल्लोष साजरा केला.

कृष्णा भगत, हेमंत वाजे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने निर्विवाद यश मिळविले; तर विरोधी ॲड. शिवाजीराव देशमुख, नामदेव कोतवाल यांच्या परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. दुपारी चारनंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ‘प्रगती’चे कृष्णा भगत आणि ‘परिवर्तन’चे ॲड. शिवाजीराव देशमुख यांच्यात जोरदार लढत सुरू होती. रात्री उशिरापर्यंत मतमोजणीत श्री. भगत आघाडीवर होते. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांवर प्रगतीचे राजेंद्र देशपांडे (२७३), नरेंद्र वैद्य (२९५) हे विजयी झाले. त्यांनी ‘परिवर्तन’च्या नामदेव कोतवाल (१६९), राजेंद्र अंकार (११९) यांना पराभूत केले. कार्यवाहपदी ‘प्रगती’चे हेमंत वाजे हे अगोदरच बिनविरोध निवडले गेले आहेत.

महिला गटाच्या दोन जागांसाठी सुरुवातीला मतमोजणी सुरू असतानाच निकालाचा कल दिसून आला. सकाळी आठला मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एकपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मतदानासाठी आलेल्या मतदारांना उमेदवार हात जोडून नमस्कार करीत होते. दुपारी तीनला मतदान संपेपर्यंत ५०३ सदस्यांपैकी ४५६ सदस्यांनी मतदानाचा हक्का बजावला. निवडणुकीसाठी ९०.६५ टक्के मतदान झाले. विजयानंतर प्रगती पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

Nashik Municipal Corporations : नाशिक: ११ पालिकांच्या प्रभागरचनेचा अंतिम अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर होणार

असा आहे निकाल

‘प्रगती’च्या माधवी पंडित (३६९), निर्मल खिंवसरा (३५३) या विजयी झाल्या; तर ‘परिवर्तन’च्या एकमेव महिला उमेदवार डॉ. कल्पना परदेशी यांना १३४ मते मिळाली. त्या पराभूत झाल्या. २३ मते बाद झाली. विश्वस्तपदासाठीच्या सात जागांवर ‘प्रगती’चे उमेदवार विजयी झाले. सुनील उगले (३१४), सागर गुजर (३५७), मनीष गुजराथी (३७१), जितेंद्र जगताप (३१६), उज्ज्वल पंडित (२८७), विलास पाटील (३५२), मनोज भंडारी (३३७) हे विजयी झाले; तर ‘परिवर्तन’चे श्यामसुंदर झळके (९४), गोपाळ बर्के (९७), राजाराम मुंगसे (२०९), अजय शिंदे (१११) हे पराभूत झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.